सातारा

Satara News: शैक्षणिक गुणवत्ता निर्देशांकात साताऱ्याची झेप; देशात दहावा तर महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक

सातारा जिल्ह्याने गेल्या २ वर्षांपेक्षा सरस कामगिरी करत २६ व्या क्रमांकावरून देशात १० वा क्रमांक मिळवला

पुढारी वृत्तसेवा

सातारा : शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत मानाचा मानला जाणारा व शालेय भौतिक सुविधा व गुणवत्तेसाठी दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक गुणवत्ता निर्देशांकात सातारा जिल्ह्याने देशात दहावा तर महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक पटकावला.

केंद्र सरकारच्या मार्फत जाहीर करण्यात आले. सातारा जिल्ह्याने गेल्या २ वर्षांपेक्षा सरस कामगिरी करत २६ व्या क्रमांकावरून देशात १० वा क्रमांक मिळवला. सातारा जिल्ह्यातील मॉडेल स्कूल उपक्रमासह विविध शैक्षणिक उपक्रमामुळे सातारा जिल्ह्याने हे यश मिळवले आहे. गेल्या वर्षापासून भौतिक सुविधा, गुणवत्ता व लोक सहभाग या त्रिसूत्रीवर जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजूभैया भोसले, शिक्षण सभापती तेजस्विनी कदम यांनी वेळोवेळी शिक्षण विभागाचा आढावा घेऊन जि. प. सदस्यांची समन्वय साधत शाळांची गुणवत्ता कशी वाढेल याबाबत सूक्ष्म नियोजन केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी पदभार स्वीकारल्यापासून शिक्षण विभागाला मार्गदर्शन केले. प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी गुणवत्ता वाढीसाठी शैक्षणिक गुणवत्ता दिनदर्शिका तयार केली. त्यावर आधारित दर महिन्याला चाचण्या यु-डायसची प्रभावी अंमलबजावणी, आनंददायी अभ्यासक्रम, शिष्यवृत्ती परीक्षा, मराठी, गणित, इंग्रजी मूलभूत कौशल्य वाढवण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम, दैनंदिन अध्यापनात डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात आला.

शैक्षणिक क्षेत्रात हे यश मिळाल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षापासून शिक्षण विभागाच्या वतीने सर्व पर्यवेक्षीय यंत्रणेला वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आले. शैक्षणिक गुणवत्ता निर्देशकाच्या या यशामुळे सातारा जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेचा पॅटर्न राज्यभर कौतुकास्पद ठरला आहे. या यशामुळे भविष्यात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वाव मिळणार आहे. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या वतीने मिळणाऱ्या विविध शासकीय योजनांचा लाभ जिल्ह्याच्या शिक्षण विभागाला मिळणार आहे.

प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, योजना शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, उपशिक्षणाधिकारी, सर्व गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षण विस्तार अधिकारी यांचे जि.प. अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजूभैया भोसले, शिक्षण सभापती तेजस्विनी कदम यांनी अभिनंदन केले.

जिल्ह्याने शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे. केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या शैक्षणिक गुणवत्ता निर्देशांकामध्ये सातारा जिल्ह्याने देशात दहावा क्रमांक पटकावला आहे. ही कामगिरी जिल्ह्यातील शिक्षण विभाग, शिक्षक, विद्यार्थी आणि स्थानिक प्रशासनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित मानली जात आहे.
-डॉ. प्रिया शिंदे, अध्यक्षा, जि.प. सातारा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT