सातारा: शालेय विद्यार्थ्यांचे उत्तम आरोग्य व भविष्यासाठी राज्य शासनाने शाळा परिसर तंबाखूमुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सातारा शहरासह जिल्ह्यातील बहुतांश शाळांना याचा विसर पडला आहे. यावर दै. ‘पुढारी’ने ‘शाळा व्यवस्थापनांकडून कोटपा फाट्यावर’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केले होते. यामुळे जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग खडबडून जागा आहे. पुढारीच्या दणक्यानंतर झेडपीच्या शिक्षण विभागाने शाळांची झाडाझडती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतच्या सूचना गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
राज्य शासनाने सर्व शाळा व शैक्षणिक संस्थांचा परिसर तंबाखूमुक्त करण्याचा निर्णण घेतला होता. त्यानुसार शाळेच्या 100 मीटर परिसरात यलो लाईन आखून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंद घातली होती. मात्र, सातारा शहरासह जिल्ह्यातील बहुतांश शाळांना याचा विसर पडला आहे. मागील शैक्षणिक वर्ष तसेच नवीन शैक्षणक वर्षातील दुसरे सत्र सुरु झाले अद्यापही अनेक शाळा परिसरात या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर ‘दै. पुढारी’ने ‘शाळा व्यवस्थापनांकडून कोटपा फाट्यावर’ या मथळ्याखाली वार्तांकन केले होते. या बातमीमुळे शैक्षणिक वर्तुळासह पालक वर्गातही मोठी चर्चा झाली. जिल्हा परिषद शिक्षण विभागही अलर्ट झाला आहे. शिक्षण अधिकाऱ्यांनी थेट आदेश काढून गटशिक्षण अधिकाऱ्यांना कोटपा कायद्यानुसार अंमलबजावणीच्या सर्व शाळांना सूचना दिल्या आहेत. या सूचनांनुसार शाळाच्या परिसरात धुम्रपान निषेध क्षेत्र असा लाल रंगाच्या चिन्हासहित फलक हा प्रवेशव्दार, प्रत्येक मजल्यावर लावणे बंधनकारक केले आहे. तसेच तंबाखूमुक्त शाळा हा फलकही शाळा प्रवेशव्दारावर लावावा. शाळा परिसरात पानपट्टी किंवा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्यास तत्काळ बंद करावी. केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांमार्फत शाळांची तपासणी करुन त्याचा अहवाल शिक्षण विभागाला द्यावा, अशाही सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.