Satara drug factory : ओंकार डिगेला ताब्यात घेऊन पुन्हा सोडून का दिले? Pudhari
सातारा

Satara drug factory : ओंकार डिगेला ताब्यात घेऊन पुन्हा सोडून का दिले?

बेड्या घातल्याचे डोळ्यांनी पाहिल्याचे सावरी व म्हावशीतील स्थानिकांचे म्हणणे

पुढारी वृत्तसेवा
निलेश शिंदे

बामणोली : सावरी (ता. जावली) गावच्या हद्दीमध्ये मुंबई पोलिसांनी छापा टाकत या ठिकाणी सुरू असलेल्या ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश केल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारवाईदरम्यान स्थानिक नागरिकांनी ओंकार डिगे याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे पाहिले होते, मग या डिगेला पुन्हा का मोकाट सोडले?, ड्रग्ज प्रकरणात त्याचा नेमका रोल काय?, डिगेचे मुंबई-पुणे कनेक्शन आहे का?, असे अनेक प्रश्न पुढे आले असून पोलिस या प्रश्नांची उत्तरे देणार का? असा सवालही सावरी आणि म्हावशी गावातील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

सावरी येथील एमडी ड्रग्जच्या फॅक्टरीवर छापा टाकून 115 कोटींचे घबाड पोलिसांनी शनिवारी हस्तगत केले होते. त्यामध्ये 50 कोटींचे 7॥ किलोचे एमडी ड्रग्ज, 38 किलो लिक्विड, अमली पदार्थ निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल व साहित्याचाही समावेश होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या कारवाई दरम्यान ओंकार डिगे हे नाव समोर आले. ओंकार डिगे हा पावशेवाडी येथील रहिवासी असून बांधकाम व्यवसायाशी संबंधित तो आहे. या ड्रग्ज फॅक्टरीचा मुख्य सूत्रधार म्हणून त्याची संपूर्ण कोयना विभाग 105 गावांमध्ये चर्चा आहे.

मुंबई पोलिसांचे पथक शनिवारी पहाटे सावरी गावच्या हद्दीत दाखल झाले. दाखल झाल्या झाल्या त्यांनी ओंकार डिगे याला ताब्यात घेतल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पोलिस कारवाई सुरु असताना दुपारपर्यंत डिगे तिथे होता, असे स्थानिक सांगत आहेत. त्याला बेड्या घालून पोलिस वाहनातून ज्या ठिकाणी ड्रग्ज फॅक्टरी सुरू आहे त्या ठिकाणी नेले होते. हा सर्व प्रकार सावरी आणि म्हावशी गावातील ग्रामस्थांनी स्वतःच्या डोळ्याने पाहिल्याचे ते सांगत आहेत.

पोलिसांनी ओंकार डिगे याला सकाळी ताब्यात घेतले होते मात्र दुपारनंतर त्याला सोडून दिले. दिवसभर मुंबई पोलीस या ड्रग्ज फॅक्टरीच्या ठिकाणी कसून तपास करत होते. मुंबईमधून आणलेला एक आरोपी व फॅक्टरीमध्ये काम करणारे तीन कामगार अशा चार आरोपींना घेऊन रात्री साडेसातच्या सुमारास मुंबई पोलिस मुद्देमालासह मुंबईकडे रवाना झाले. मात्र यामध्ये ओंकार डिगे कुठेही दिसून आला नाही.

ओंकार डिगे याने याच ठिकाणी काही महिन्यांपूर्वी असेच उद्योग केल्याची चर्चा आता सावरी आणि मावशी गावातील ग्रामस्थ बोलू लागले आहेत. त्यामुळे ओंकार डिगे नामक व्यक्तीला पोलीस ताब्यात घेणार का? त्याच्याकडे कसून चौकशी करणार का? सद्यस्थितीत तरी ओंकार डिगे ला वाचवण्यासाठी कोणती राजकीय शक्ती प्रयत्न करत आहे?, हा संशोधनाचा भाग आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जावे, अशी आग्रही मागणी कोयना भाग 105 गावातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.‌

‘या‌’ प्रश्नांची उत्तरे कोण देणार?

ओंकार डिगे या संपूर्ण प्रकरणांमध्ये कुठेही नव्हता तर त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन बेड्या का ठोकल्या होत्या?

डिगेला फक्त ताब्यात घेतले असेल तर कशाच्या आधारावर ताब्यात घेतले?, त्याच्या मोबाईलमध्ये काही संशयास्पद आढळले आहे का?

चौकशी केली आणि त्यानंतर त्याला सोडून दिले असेल तर त्याच्या चौकशीत नक्की काय समोर आले?,

त्याला कोणत्या आधारे पोलिसांनी सोडून दिले?

तपासात ओंकार डिगे याला पोलिसांनी रेकॉर्डवर का घेतले नाही?

ड्रग्ज फॅक्टरीतील कामगारांना जेवण पुरवण्याचे काम डिगे करत होता, असा स्थानिकांना संशय आहे. मग पोलिसांच्या तपासात त्यादृष्टीने काय पुढे आले?

पोलिसांनी अटक केलेल्या कामगारांना ड्रग्ज फॅक्टरीसाठी संबंधित जागा उपलब्ध करून देणारा मुख्य सूत्रधार ओंकार डिगे होता, असे सावरी आणि म्हावशी गावातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मग नक्की खरं काय?.

ड्रग्ज फॅक्टरी ज्या वाड्यामध्ये सुरू होती त्या वाड्याचा मालक गोविंद शिंदकर याने स्वतः कबूल केले आहे की माझ्या वाड्याची चावी कामगारांना राहण्यासाठी ओंकार डिगे नामक व्यक्तीने काही दिवसांपूर्वी नेली होती मग पोलिसांनी ओंकार डिगे याला का सोडले?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT