सातारा : सदरबझार येथे कॉलेज परिसरासह रहिवासी एरियात खुलेआम चरस, ड्रग्ज, गांजा ओढून टोळक्यांकडून अक्षरश: धुडगूस घातला जात आहे. सातार्यात ‘दम मारो दम’मध्ये तरुणाई भरकटत असून पोलिसांनी कारवाईचा फास आवळण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी रात्री धुडगूस घालणार्या टोळक्यांना पोलिसांनी चोप देण्याची मागणी होत आहे.
सदरबझार येथील इंजिनिअरींग कॉलेज परिसरात रात्रीच्यावेळी गांजासह अंमली पदार्थाची नशा करत घोळका करुन बसणार्या युवकांची संख्या वाढली आहे. यामध्ये झोपडपट्टीतील युवकांचा सहभाग लक्षणीय आहे. कॉलेज परिसरात झाडांच्या अडोशाला, अडगळीत गंजाड्यांची टोळकी वाढू लागली आहेत. यामुळे येणार्या-जाणार्या व रहिवासी असलेल्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सायंकाळनंतर परिसरात शुकशुकाट असतो. यामुळे युवती व महिलांसाठी हा परिसर असुरक्षित बनू लागला आहे. नशेखोर टोळक्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शहर पोलिसांनी परिसरात प्रामुख्याने गस्त वाढवावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांची आहे.
सातारा शहरासह परिसरात गेल्या काही वर्षात नशा करणार्या युवकांचे प्रमाण वाढले आहे. नशेखोरांमध्ये प्रामुख्याने चरस, गांजा मारण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. या अमली पदार्थामुळे नशेखोर आपल्यावरील नियंत्रण हरवून गुन्हेगारी कृत्य करत आहे. गांजाची बांटा गोळी मिळण्यासोबतच चरस मिळत असल्याचीही धक्कादायक माहिती आहे. यामुळे खुलेआम विक्री सुरु असलेले अड्डे पोलिसांनी उद्ध्वस्त केले पाहिजेत. किरकोळ स्वरुपाचा गांजा, गांजाची गोळी टपर्यांमध्ये सहज उपलब्ध होत आहे. यामुळे छोट्या विक्रेत्यांसोबत त्याच्या मुळाशी जाण्याची गरज निर्माण झाली आहे.
सातारा शहरात गेल्या काही महिन्यांपासून गांजा ओढताना सुमारे 25 हून अधिक युवकांना पोलिसांनी पकडले आहे. अशा नशेखोर युवकांवर पोलिस ठाण्यात गुन्हे देखील दाखल झाले आहेत. मात्र तरीही चोरी-छुपके गांजा मिळत असल्याने टोळक्यांची दशहत वाढत आहे. यामुळे याची पाळेमुळे खनून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.