जीवन संपविण्याचा प्रयत्न केलेल्या डॉ. रुपनवर यांचा मृत्यू  
सातारा

Satara Crime : जीवन संपविण्याचा प्रयत्न केलेल्या डॉ. रुपनवर यांचा मृत्यू

राज्यात खळबळ : डॉ. संपदा मुंडेंनंतर आणखी एका डॉक्टरचा बळी

पुढारी वृत्तसेवा

सातारा/मुंबई : फलटण उपजिल्हा रुग्णालयाशी संबंधित आणखी एका डॉक्टरच्या मृत्यूने राज्यात पुन्हा खळबळ उडाली आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र जगन्नाथ रूपनवर (वय २७, रा. फडतरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी मुंबईतील सायन परिसरात जीवन संपविण्याचा प्रयत्न केला होता. सोमवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने या प्रकरणाला आता आणखी नवे वळण मिळाले आहे. वैद्यकीय व फिटनेस प्रमाणपत्रांसारख्या कामांसाठी राजकीय व्यक्ती आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोप करून डॉ. रूपनवर यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने हे प्रकरण तापण्याची चिन्हे आहेत. काही महिन्यांपूर्वी याच रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांनीही आत्महत्या केली होती.

मिळालेली माहिती अशी, फलटण उपजिल्हा रूग्णालयातील आरोग्य विभागाच्या कारभारामागची साडेसाती कायम आहे. याच रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डाॅ. संपदा मुंडे यांनी गतवर्षी ऑक्टोबरमध्ये चिठ्ठी लिहून जीवन संपविले होते. त्यानंतर आता डॉ. रूपनवर यांनीही जीवन संपविल्याचे समोर आले आहे. २७ ऑगस्ट रोजी सकाळी सायन रेल्वे स्थानक परिसरातील उच्चदाबाच्या टॉवरवर चढून डॉ. रूपनवर यांनी जीवन संपविण्याचा प्रयत्न केला होता. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात आल्याने प्राथमिक उपचार करण्यात आले आणि त्यांना सायन रुग्णालयात दाखल केले. डॉ. रूपनवर यांनी यापूर्वी काही गंभीर आरोप केले होते. शस्त्र परवान्यासाठी आवश्यक असलेले वैद्यकीय 'फिटनेस सर्टिफिकेट' देण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात आला आणि नकार दिल्यानंतर धमकी व धक्काबुक्की झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. या प्रकरणात संबंधित व्यक्तींविरोधात फलटण पोलिसांत तक्रार आणि गुन्हा दाखल केला होता. डॉ. रूपनवर यांनी एका माजी आरोग्य मंत्र्याचा पीए असलेला प्रसाद प्रदीप कोंडे-देशमुख व अन्य एकावर फलटण पोलिसात गुन्हा दाखल केला होता. तसेच आरोग्य उपसंचालक यांच्याविरोधातही तक्रार केली होती.

या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे डॉ. रूपनवर यांनी यापूर्वीही टोकाचे पाऊल उचलण्याचा इशारा दिला होता. हातावर सुसाईड नोट लिहिल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांनी सोशल मीडिया पोस्ट आणि व्हिडीओच्या माध्यमातूनही व्यथा मांडली होती. पोलिसांनी त्यांचे समुपदेशन केले होते; मात्र त्यानंतरही वाद कायम राहिला होता. त्यातूनच त्यांनी २९ ऑगस्ट रोजी आत्महत्या करणार असल्याचे पत्र व व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यानंतर पोलिसांनीही त्यांचे समुपदेशन केले होते. त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणीही केली होती.

वरिष्ठांच्या निर्देशानुसार या प्रकरणात चौकशी समिती नेमण्यात आली होती. समितीने डॉ. रूपनवर यांचीही चौकशी केली. मात्र, महिना उलटूनही अहवाल जाहीर झाला नसल्याचा आरोप करत त्यांनी पहिल्यांदा १८ ऑगस्ट रोजी पुन्हा आत्महत्येचा इशारा दिला होता. त्यानंतर गुरुवारी २७ रोजी मुंबईत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना सायन येथील महानगरपालिका रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी प्रकृती चिंताजनक असल्याने अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले. ३० रोजी त्यांची प्रकृती स्थिर झाल्याने त्यांना जेवण दिले होते. मात्र, सोमवारी (दि. ३१) दुपारी २ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी ­­२९ जुलै रोजी राजीनामा दिला असून दि. ३० पासून ते कामावर आले नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

असा आहे घटनाक्रम

२६ जुलै २०२६ : डॉ. राजेंद्र रूपनवर यांनी प्रशासकीय व वरिष्ठांच्या त्रासाबाबत एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल केले होते, ज्यामध्ये त्यांनी आत्महत्येचा इशारा दिला होता.

२७ ऑगस्ट २०२६ : मानसिक व कामाचा ताण सहन न झाल्याने डॉ. रूपनवर यांनी मुंबईतील सायन रेल्वे स्टेशन परिसरातील एका हायहोल्टेज टॉवरवर चढून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच धाव घेऊन त्यांना खाली उतरवले. गंभीर प्रकृतीमुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते.

२९ ऑगस्ट २०२६ : या घटनेनंतर डॉ. रूपनवर यांनी आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी दिलेल्या पत्रांमधून आरोग्य विभागातील वरिष्ठांवर गंभीर आरोप समोर आले. शस्त्र परवान्यासाठी व प्रमाणपत्रांसाठी राजकीय दबाव असल्याचा मुद्दा चर्चा आला.

३१ ऑगस्ट २०२६ : मुंबईत उपचार सुरू असताना सोमवारी डॉ. राजेंद्र रूपनवर यांचा मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT