सातारा

सातारा : पहिल्या दिवशी कोल्हापूरचे वर्चस्व

backup backup

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातार्‍यातील जिल्हा क्रीडा संकुलात महाराष्ट्र केसरीचा मंगळवारी सायंकाळपासून थरार सुरू झाला. अनेक रोमांचक लढतींमुळे पहिल्याच दिवशी रंगत भरली. कुस्तीची पंढरी असणार्‍या कोल्हापूरच्या पैलवानांनी पहिल्याच दिवशी वर्चस्व राखले. रात्री 9 वाजेपर्यंत सुमारे 150 हून अधिक लढती झाल्या. यामध्ये सातार्‍याच्या पैलवानांनीही चमकदार कामगिरी करत पुढील फेरीत प्रवेश मिळवला.

जिल्हा क्रीडा संकुलात मंगळवारी 64 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सायंकाळी पाचनंतर शुभारंभ झाला. पहिल्या दिवशी 57 किलो वजन गटात एकूण 37 लढती झाल्या. यामध्ये आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सोलापूरचा पै. सौरभ इगवे, सुवर्णपदक विजेता बीडचा पै. अतिष तोडकर यांनी चमकदार कामगिरी केल्याने ते अंतिम लढतीसाठी दावेदार झाले आहेत. तर माती विभागात दोन फेर्‍या पूर्ण झाल्या. त्यामध्ये सातार्‍याचा तेजस गोमणे, कोल्हापूरचा अक्षय डेरे, सोलापूरचा जोतिबा अटकळे, कोल्हापूरचा विनायक चव्हाण यांनीही चांगली कामगिरी करत पुढची फेरी गाठली.

70 किलो वजन गटात गादीमध्ये तिसर्‍या फेरी अखेर कोल्हापूरचा शुभम पाटील, सोनबा गोंगणे, सिंधूदुर्गचा कल्पेश तळेकर, जालन्याचा हर्षद शेख यांनी विजय मिळवत आगेकूच केली आहे. तर या वजनगटात मातीमध्ये चार लढती झाल्या आहेत.

92 किलो वजनगटात मातीमध्ये दुसर्‍या फेरीअखेर सातार्‍याचा अक्षय मोहिते, सांगलीचा सयाजी जाधव, कोल्हापूरचा हर्षद पाचकाडे, सोलापूरचा नागेश शिंदे यांनी तिसर्‍या फेरीत प्रवेश मिळवला तर गादीमध्ये कोल्हापूरचा सुशांत तोबाळकर, सातार्‍याचा अजय थोरात, सांगलीचा भारत पवार, सोलापूरचा गणेश चव्हाण यांनी पुढील फेरीत प्रवेश केला. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत लढती सुरूच होत्या. या लढतींमध्ये गादी गटात अनेक पैलवानांनी विरोधी मल्लाला चितपट करण्याऐवजी गुणांद्वारे डावावर पकड घेण्यास मिळवल्याचे दिसून आले. पहिल्या दिवशी सर्व वजनगटात सहा फेर्‍या झाल्या. बुधवारी सकाळी या सर्व फेर्‍यांमधील अंतिम फेरीत जाणार्‍या पैलवानांची नावे जाहीर केली जाणार आहेत. त्यानंतर प्रत्येक वजनगटानिहाय अंतिम लढत खेळवली जाणार आहे. अंतिम लढत झाल्यानंतर सायंकाळी बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.

मातीतील कुस्तीला शौकीनांची दाद

जिल्हा क्रीडा संकुलात सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पहिल्या दिवशीत 6 फेर्‍या पूर्ण झाल्या. माती व गादी गटामध्ये तुल्यबळ मल्लांमध्ये भिडंत झाली. राज्यस्तरीत स्पर्धा सातार्‍यात होत असल्याने सातारकर व कुस्ती शौकीनांनी तोबा गर्दी केली होती. त्यामध्येही रांगडा खेळ असणारी कुस्ती पाहण्यासाठी शौकीनांनी माती गटाला अधिक पसंती दिली. या गटात होणारे डावपेच व लढतींचा कुस्तीप्रेमींनी आनंद घेतला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT