सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. संपदा मुंडे यांच्या हातावरील सुसाईड नोटमधील अक्षर डॉ. संपदा मुंडे यांचे नसल्याचा दावा शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. तसेच महिला डॉक्टरने लिहिलेल्या सुसाईड नोटमधील एक शब्द आणि यापूर्वी लिहिलेल्या एका चार पानी पत्रातील तोच शब्द वेगळ्या पद्धतीने लिहिला गेला आहे. त्यामुळे महिला डॉक्टरची आत्महत्या आहे की हत्या झाली? असा सवालही अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
देशभर खळबळ उडालेल्या डॉक्टर आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. विरोधी पक्षातील नेते रोज नवे दावे करत असून सत्ताधाऱ्यांवर संशयाची सुई ठेवत आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी बुधवारी पुन्हा पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी विविध प्रकारचे दावे केले आहेत. अंधारे यांनी महिला डॉक्टर प्रकरणातील काही पुरावे सर्वांसमोर मांडले आहेत. त्यांनी महिला डॉ. संपदा मुंडे यांच्या हातावरील लिहिल्या गेलेल्या मेसेजमधील ‘पोलिस निरीक्षक’ हा शब्द आणि चार पानी लिहिलेलं लेटर यात फरक असल्याचे अंधारे यांनी स्पष्ट केले आहे. या चार पानी पत्रात महिला डॉक्टरने ‘निरीक्षक’ हा शब्द जवळपास नऊ वेळा लिहिला आहे. त्यामुळे सुसाईड नोटमध्ये लिहिताना महिला डॉक्टरने तो शब्द ‘निरीक्षक’ असा चुकीचा कसा लिहिला? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.
अंधारे म्हणाल्या, आत्महत्या केलेल्या डॉक्टरच्या चार पानी पत्रातील ‘निरीक्षक’ हा शब्द आहे, त्यातील र ची जी वेलांटी आहे ती दीर्घ आहे. तर हातावरील शब्दाची वेलांटी ही ऱ्हस्व लिहिली गेली असल्याने संशय घ्यायला जागा आहे. हे काम पोलिसांचे आहे. मी सोपं करून देतेय. नऊ वेळा तिने लिहिलेला हा शब्द हा आणि त्याची वेलांटी दुसरी आहे. अगदी त्याच वेळेला तिच्या हातावर जो निरीक्षक शब्द लिहिला आहे, त्याची वेलांटी पहिली आहे. हे धक्कादायक आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.