साखरवाडी : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. घटनेनंतर डॉ. मुंडे यांच्या मोबाईलमधील महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्यात आल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. तसेच ही आत्महत्या नसून पूर्वनियोजित हत्या असल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे.
डॉ. मुंडे कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या दिवशी पोलिसांना सायंकाळी साडेसात वाजता आत्महत्येची माहिती मिळाली होती. मात्र, आम्ही फलटण येथे रात्री 3 वाजता पोहोचलो, तेव्हा पोलिसांनी आम्हाला सांगितले की, डॉ. मुंडे यांचा मोबाईल पोलिसांकडे सील केला आहे. तथापि, तिच्या मोबाईलवरील व्हॉटस्ॲपचा ‘लास्ट सीन’ रात्री 11 वाजून 13 मिनिटांनी दिसत आहे. त्यामुळे या दरम्यान मोबाईल कोणी अनलॉक केला आणि कोणी वापरला, याबाबत गंभीर संशय उपस्थित झाला आहे.
कुटुंबीयांचा आरोप आहे की, संपदा मुंडे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोबाईलमध्ये त्याच फिंगरप्रिंटचा वापर करून मोबाईल अनलॉक करण्यात आला आणि त्यामधील अनेक महत्त्वाचा डेटा व पुरावे डिलीट करण्यात आले. या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी या कुटुंबीयांनी केली आहे.
प्रकरणातील संशयित निलंबित पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने शनिवारी रात्री स्वतः फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात हजर झाला होता. मात्र, तो हजर होण्यापूर्वी त्याने स्वत:चा मोबाईल लपवल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिस सूत्रांनी याची पुष्टी दिली असून, बदनेचा मोबाईल हा या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा मानला जात आहे.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, डॉ. मुंडे यांच्या मृत्यूपूर्वी आणि नंतर झालेल्या संपर्कांबाबतचे अनेक पुरावे या मोबाईलमध्ये असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासासाठी हा मोबाईल अत्यंत निर्णायक ठरणार आहे. सध्या पोलिसांकडून बदनेचा मोबाईल शोधण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यातील डेटाचा डिजिटल फॉरेन्सिक तपास करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.