सातारा : फलटण येथील हॉटेलमध्ये गळफास घेतलेल्या डॉ. संपदा मुंडे यांचा हॉटेलमध्ये प्रवेश करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये त्या मध्यरात्री आल्या असून रूममध्ये आत जाताना दिसत आहेत.
गेल्या आठवड्यात फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे कर्तव्य बजावत असलेल्या डॉ. संपदा मुंडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेनंतर कुटुंबीयांनी तसेच सामाजिक संघटनांनी आत्महत्या की हत्या? असा सवाल उपस्थित केला. तसेच डॉ. संपदा मुंडे यांनी हातावर फौजदार गोपाळ बदने व प्रशांत बनकर यांची नावे लिहून त्यांना जबाबदार धरले. यामध्ये फौजदार गोपाळ बदने याने वेळोवेळी अत्याचार केल्याचे हातावर म्हटल्याने राज्यात खळबळ उडाली. दुसरीकडे डॉ. संपदा मुंडे यांनी अनेक तक्रार अर्ज केल्याचेही समोर आल्यानंतर मृत्यूबाबत गूढ निर्माण झाले.
फलटण पोलिसांनी डॉ. संपदा मुंडे यांच्या मृत्यूनंतर घटनास्थळाचा पंचनामा करून हॉटेलचे सर्व सीसीटीव्ही फुटेज, डीव्हीआर जप्त केले. यामध्ये डॉ. संपदा मुंडे या मध्यरात्री दीड वाजता आल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे. हॉटेल चालकाकडे नाव नोंद केल्यानंतर त्या खोलीमध्ये जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून दिसत आहे. याशिवाय त्या हॉटेलमध्ये असेपर्यंत इतर कोणीही त्या रूममध्ये गेलेले किंवा संशयास्पद हालचाली झाली नसल्याचे पोलिसांनी अगोदरच सांगितले आहे. याबाबत हाच व्हिडीओ बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.