DJ News 
सातारा

Satara : डीजेचा दणदणाट; ‘बोले मामा’ची आठवण

बलरामपूर घटनेने ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर : साताऱ्यात कारवाईची गरज

पुढारी वृत्तसेवा

सातारा : उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथे डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्‍याने ध्वनिप्रदूषणाचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेने काही वर्षांपूर्वी साताऱ्यात घडलेल्या 'बोले मामा' प्रकरणाची आठवण करून दिली आहे. डीजेच्या दणदणाटा दरम्यान भिंत कोसळून 'बोले मामा' यांचा मृत्यू झाल्याची घटना साताऱ्यात घडली होती. या पार्श्वभूमीवर सातार्‍यातही कारवाई गरजेची झाली आहे.

बलरामपूर येथील एका शाळेत सोमवारी वैष्णवी तिवारी ही विद्यार्थिनी अचानक आपल्या जागेवरून उठून खाली कोसळली. काही वेळाने ती सावरली; मात्र त्यानंतर पुन्हा बेशुद्ध पडली. शिक्षकांनी तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. शाळा व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार घटना घडली त्यावेळी शाळेजवळून गणेश विसर्जनाची मिरवणूक जात होती आणि मोठ्या आवाजात डीजे सुरू होता. या आवाजामुळे विद्यार्थिनीची प्रकृती बिघडल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अधिकृत वैद्यकीय तपासणीतून स्पष्ट झालेले नाही.

काही वर्षांपूर्वी साताऱ्यात डीजेच्या दणदणाटादरम्यान भिंत कोसळून 'बोले मामा' यांचा जीव गेला. त्या घटनेनंतर कर्णकर्कश ध्वनियंत्रणांच्या वापराबाबत चर्चा झाली. ध्वनी हा केवळ कानाला त्रास देणारा घटक नसून, त्याच्या अतिरेकाचे गंभीर परिणाम होऊ शकतात, याची जाणीव या घटनेने करून दिली. ध्वनिप्रदूषणावर नियंत्रणासाठी नियम आहेत. ध्वनीची डेसिबल पातळी मोजणे, त्याचे पुरावे संकलित करणे आणि नियमभंग आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया आहे. मात्र, ही प्रक्रिया कागदावर राहण्याऐवजी प्रत्यक्षात राबवणे महत्त्वाचे आहे.

गणेशोत्सवाचा उत्साह आणि जल्लोष कायम ठेवतानाच ध्वनिमर्यादेचे भान ठेवणे गरजेचे आहे. 'बोले मामा' यांचा बळी गेल्यानंतर साताऱ्याने ध्वनिप्रदूषणाचा धोका अनुभवला आहे. त्यामुळे पुन्हा एखाद्या दुर्घटनेनंतर जागे होण्याऐवजी नियमभंग होत असतानाच कारवाई झाली पाहिजे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT