दिवशी घाट : येथील मार्गावर पावसामुळे मंगळवारी कोसळलेली दरड. Pudhari Photo
सातारा

Satara News | दिवशी घाटात कोसळली दरड

वाहतूक विस्कळीत; घाट मार्गावर धोका, बांधकाम खात्याने कानाडोळा केल्याने संतप्त प्रतिक्रिया

पुढारी वृत्तसेवा

ढेबेवाडी : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पाटण तालुक्यातील ढेबेवाडी व पाटण या दोन विभागांना जोडणार्‍या दिवशी घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून अजूनही काही ठिकाणी धोकादायक परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर दरड कोसळण्यापूर्वीच ती हटविण्यात यावी, अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे.

मागील आठवडा भरापासून पाटण तालुक्यासह ढेबेवाडी विभाग व परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने ढेबेवाडी - पाटण मार्गावर बर्‍याच ठिकाणी गटर्स काढलेले नाहीत. त्यामुळे डोंगरावरून खाली येणारे पाणी थेट रस्त्यावर येत आहे. त्यामुळे वाहन चालविताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. याशिवाय घाटात अधूनमधून छोट्या - मोठ्या दरडी ढासळत आहेत. त्यामुळे घाटात वाहन चालविताना वाहन चालकांसह व प्रवाशामध्ये भितीचे वातावरण निर्माण होत आहे.

अनेक ठिकाणी दरडी कोसळत असल्याने पावसाच्या पाण्याबरोबर डोंगरातून लहान मोठे दगड व माती रस्त्यावर येत आहे. त्यामुळे वाहने विशेषतः दुचाकी घसरून छोट्या मोठ्या अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात घाटातून प्रवास करणे धोक्याचे व जोखमीचे झाले आहे कोणत्या ही क्षणी दरड कोसळेल अशी भिती कायम असते.

दिवशी घाटात अनेकदा छोट्या-मोठ्या दरडी यापूर्वी कोसळल्या आहेत. त्यात अनेक प्रवासी सापडून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर अनेक ठिकाणी डोंगर दुभंगला असून त्या ठिकाणाहून दगड व माती केव्हाही खाली रस्त्यावर पडू शकते अशी परिस्थिती आहे. दिवशी घाटामध्ये अनेक ठिकाणी रस्ता रूंदीकरण केलेले असले तरीही घाटात काही ठिकाणी रस्ता अरुंद व नागमोडी वळणाचा असल्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी प्रवाशी व वाहन चालकांना अशा जागी वाहतुकीस अडथळा निर्माण होतो.

पाटण हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे शासकीय कामासाठी कायम पाटणला जावे लागते. तसेच शिक्षणासाठी दररोज शेकडो विद्यार्थी दुचाकी, एसटीमधून जात असतात या घाटातून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूकही होत असते. त्यामुळेच त्वरित उपाययोजना करत धोकादायक ठिकाणी डागडुजी करत दरड हटविणे आवश्यक आहे.

ढेबेवाडी - पाटण प्रवास सुखकर व्हावा यासाठी रस्ता रूंदीकरण करण्यात आला असला तरी काही ठिकाणी रूंदीकरण करण्यात आलेले नाही. रूंदीकरण नसलेल्या ठिकाणी अजूनही धोका आहे.
- दिलीपराव शामराव पाटील सामाजिक कार्यकर्ते गुढे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT