सातारा

सातारा : जिल्हा मुख्यमंत्र्यांचा … कारभार दुय्यमांचा

दिनेश चोरगे

सातारा :  सातारा पोलिस मुख्यालयातील गृहचे पोलिस उपअधीक्षक, कोरेगाव पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक व लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलिस उपअधीक्षक ही पदे रिक्त आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच जिल्ह्यातील या महत्वाच्या विभागांचा कारभार दुय्यम अधिकार्‍यांकडे देण्यात आला आहे. यामुळे पूर्णवेळ अधिकार्‍यांची वानवा कधी दूर होणार? असा सवाल उपस्थित झाला आहे.

सातारा जिल्हा पोलिस दलांतर्गत 33 लहान मोठी पोलिस ठाणी आहेत. त्यावर मॉनिटरींग करण्यासाठी 7 पोलिस उपविभागीय कार्यालये आहेत. तसेच वरिष्ठ अधिकारी म्हणून पोलिस अप्पर पोलिस अधीक्षक व पोलिस अधीक्षक ही पदे आहेत. गेल्या काही वर्षांपासून पोलिस ठाणी तसेच इतर महत्वाच्या विभागांना पूर्णवेळ अधिकारी मिळत नाहीत. सध्या तीन महत्वाच्या ठिकाणी अधिकारी नसल्याचे समोर आल्याने ही उदासिनता कधी संपणार असा सवाल उपलब्ध झाला आहे. त्या पदाचे, दर्जाचे अधिकारी नसतील तर काय होवू शकते? हे पुसेसावळी येथील घटनेने नुकतेच समोर आले आहे. यामुळे तात्काळ अधिकारी नसलेल्या ठिकाणी अधिकारी उपलब्ध करण्याची गरज निर्माण झाली आहे.

पोलिस अधिकार्‍यांची होतेय कुंचबणा?

1 सातारा पोलिस दलात सध्या कोरेगाव, माण-खटाव, पाटण येथे काम करताना पोलिसांची कुंचबणा होत आहे. अनेकदा लहान-लहान गोष्टींवरुन पोलिस अधिकारी, कर्मचारी यांना चौकशी तसेच कारवाईला सामोरे जावे लागते.
2. जिथे पोलिस अधिकारी-कर्मचारी चुकला असेल तेथे निश्चित कारवाई झालीही पाहिजे. मात्र अनेकदा स्थानिक पातळीवर राजकीय मर्जी राखण्यासाठी पोलिसांचा बळी (कारवाईसाठी) जाण्याचा प्रकार वाढीस लागला आहे. यामध्ये पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक,
सहाय्यक पोलिस निरीक्षक, फौजदारापासून कर्मचार्‍यांचा समावेश राहिला आहे.

होम डीवायएसपीचा चार्ज पीआयकडे…

  • पोलिस मुख्यालयाचा कारभारी म्हणून पूर्ण वेळ पोलिस उपअधीक्षक (डीवायएसपी) दर्जाचा अधिकारी हे पद आहे. स सध्या पोलिस मुख्यालयाचा (गृह) कार्यभार पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍याकडे आहे. गेल्या सहा महिन्यांपासून डीवायएसपी दर्जाचा अधिकारीच नियुक्त करण्यात आलेला नाही.
  • तत्पूर्वी हे पद भरलेले होेते. मात्र गेल्या दहा वर्षाचा काळ पाहिला तर बहुतेकदा हे पद रिक्तच राहिले आहे.
  •  अनेकदा जिल्हा विशेष शाखेच्या पोलिस निरीक्षकाकडे देखील या विभागाचा चार्ज दिला जातो.
  •  पोलिस दलांतर्गत आस्थापनाबाबतचे जे विषय असतात तसेच महत्वाच्या सह्या लागतात त्यासाठी डीवायएसपी दर्जाचा अधिकारी असणे गरजेचे आहे.

कोरेगावमध्ये पीआयचा चार्ज एपीआयडे

कोरेगाव हे मुख्य बाजारपेठेचे व तालुक्याचे ठिकाण असून शेकडो गावांचा त्यामध्ये समावेश आहे. यामुळेच पोलिस निरीक्षक दर्जाचे हे पोलिस ठाणे आहे. मात्र गेल्या 1 वर्षापासून सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) दर्जाच्या अधिकार्‍यावर हे पोलिस ठाणे सोपवले आहे. गेल्या तीन-वर्षामध्ये पोलिस निरीक्षक दर्जाचा अधिकारी या पोलिस ठाण्यात टिकत नाही, असा सूर वाढला आहे. प्रशासकीय तसेच राजकीय वादाचा बळी जात असल्याचीही चर्चा जोरदार रंगली आहे. येत्या काळात लोकसभा, विधानसभा निवडणुका आहेत. यामुळे पोलिस निरीक्षक दर्जाचा अधिकारी असणे गरजेचे आहे.

अधिकारी द्या मग 'लाचखोरी' थांबवा

लाचलुचपत प्रतिबंधक विभागासाठी पोलिस उपअधीक्षक किंवा वरिष्ठ पोलिस निरीक्षक दर्जाचा अधिकारी नियुक्त असतो. सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात या पदाचा अधिकारी गेल्या महिन्यांपासून नाही. गेल्या वर्षभरातही हीच परिस्थिती राहिली होती. त्यामुळे कोल्हापूरच्या अधिकार्‍याकडे सातारचा चार्ज होता. या परिस्थितीमध्ये अद्याप बदल झालेला नाही. पारदर्शी सरकार, भ्रष्टाचार मुक्त भारत, अशा घोषणा करत असताना दुसरीकडे अधिकारीच नसल्याचे वास्तव आहे. पूर्ण अधिकार्‍याची वानवा असल्याने सापळा कारवाईचे प्रमाण घटले आहे. वेगवेगळ्या विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याचे आठ वर्षांपूर्वी तत्कालीन पोलिस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांचे रेकॉर्ड राहिले आहे. त्यानंतर मात्र असे रेकॉर्ड झालेले नाही. सध्या लाचलुचपत विभागाचा अधिकार्‍याविनाच दक्षता सप्ताह सुरु आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT