Satara District Hospital  File Photo
सातारा

Satara District Hospital : जिल्हा रुग्णालयाचा कारभार प्रभारींच्या खांद्यावरच

५१ पैकी ३६ वैद्यकीय पदे रिक्त : डॉक्टरांवर कामाचा अतिरिक्त ताण

पुढारी वृत्तसेवा
विशाल गुजर

सातारा : राजकीय पदांसाठी रस्सीखेच, मर्जीतील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांसाठी मंत्रालयापर्यंत फिल्डिंग आणि विविध पदांसाठी जोरदार पाठपुरावा केला जात असताना सर्वसामान्यांच्या आरोग्याशी थेट संबंध असलेल्या सातारा जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पदे मात्र वर्षानुवर्षे रिक्त आहेत. चार कॅबिनेट मंत्र्यांचे प्रतिनिधित्व असलेल्या जिल्ह्यातील २४२ खाटांच्या जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असून महत्त्वाच्या प्रशासकीय पदांचाही कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे रुग्णसेवेबरोबरच प्रशासकीय यंत्रणेवरही ताण वाढत असून जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जिल्हा रुग्णालयात दररोज सुमारे ६०० ते ८०० रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, रुग्णांच्या तुलनेत उपलब्ध वैद्यकीय मनुष्यबळ अपुरे असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. वर्ग एकमधील २० मंजूर वैद्यकीय पदांपैकी केवळ चार पदांवर अधिकारी कार्यरत असून तब्बल १६ पदे रिक्त आहेत. वर्ग दोनमधील ३१ मंजूर पदांपैकी ११ अधिकारी कार्यरत असून २० पदे रिक्त आहेत. म्हणजेच वर्ग एक आणि वर्ग दोन मिळून ५१ मंजूर पदांपैकी केवळ १५ पदांवर अधिकारी कार्यरत तर ३६ पदे रिक्त आहेत.

केवळ वरिष्ठ डॉक्टरांचीच नव्हे तर वर्ग तीन आणि वर्ग चारमधील कर्मचाऱ्यांचीही मोठी कमतरता आहे. वर्ग तीनमधील १४ मंजूर पदांपैकी केवळ चार पदे भरलेली असून १० पदे रिक्त आहेत. वर्ग तीन तांत्रिक संवर्गातील ६७ मंजूर पदांपैकी तब्बल ५८ पदे रिक्त आहेत. वर्ग चारमधील १४७ मंजूर पदांपैकी ३९ पदे रिक्त असल्याने रुग्णालयातील दैनंदिन कामकाजासाठी उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त जबाबदारी पडत आहे.

जिल्हा रुग्णालयाला केवळ प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर ठेवण्याऐवजी कायमस्वरूपी जिल्हा शल्यचिकित्सक नियुक्त करणे, रिक्त वैद्यकीय पदे भरणे आणि तांत्रिक व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची कमतरता दूर करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील चारही कॅबिनेट मंत्री, खासदार, आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधींनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून या प्रश्नासाठी एकत्रितपणे शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे.

रुग्णसेवेचा ताळमेळ लागेना...

एकीकडे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची कमतरता तर दुसरीकडे दररोज बैठका, व्हिडिओ कॉन्फरन्स आणि विविध प्रशासकीय कामकाज यामुळे उपलब्ध वैद्यकीय अधिकाऱ्यांवरील ताण वाढत असल्याचे चित्र आहे. वरिष्ठ पदे प्रभारींकडे असताना रुग्णसेवेबरोबरच प्रशासकीय बैठका आणि अहवालांची जबाबदारीही त्यांनाच पार पाडावी लागते. परिणामी, प्रत्यक्ष रुग्णसेवेसाठी उपलब्ध वेळ आणि मनुष्यबळ यांचा ताळमेळ साधण्याचे आव्हान निर्माण होत आहे. आपत्कालीन सेवा, शस्त्रक्रिया, रुग्णांची देखभाल, विभागीय समन्वय आणि प्रशासकीय निर्णय अशा अनेक जबाबदाऱ्या मोजक्या डॉक्टरांवर पडत आहेत. रुग्णालयाचा कारभार सक्षमपणे चालण्यासाठी आवश्यक असलेली पदेच रिक्त असतील, तर आरोग्य व्यवस्थेचे नियोजन आणि रुग्णसेवेची गुणवत्ता कशी राखली जाणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT