File Photo
सातारा

सातारा जिल्ह्याच्या विभाजनाची चर्चा

जिल्ह्यात प्रचंड अस्वस्थता; सरकारने तातडीने स्पष्टीकरण देण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

सातारा : गेली अनेक वर्षे गुण्यागोविंदाने, एकदिलाने सातार्‍याच्या एकत्रित छत्राखाली नांदत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सातारा जिल्ह्याचे विभाजन होणार असल्याच्या चर्चांनी सातारा जिल्ह्यातील समाजमन अस्वस्थ झाले आहे. सोशल मीडियावर नव्या जिल्ह्यांचे नकाशे फिरू लागल्याने आकाराने लहान दिसणार्‍या सातार्‍यातील समाजमनात प्रचंड नाराजी पसरली आहे. सरकारने तातडीने या विषयाचे स्पष्टीकरण करण्याची मागणी सातार्‍यातील सामाजिक कार्यकर्त्यांमधून होत आहे.

सातारा जिल्ह्याच्या विभाजनाची सातत्याने टूम निघत असते. यापूर्वीही कराड जिल्हा होणार, बारामती जिल्हा होणार अशा चर्चा रंगल्या होत्या. पृथ्वीराज चव्हाण हे कराडचे सुपुत्र असूनही त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीत त्यांनी कराड जिल्हा केला नाही. सातार्‍यापासून कराडचे अस्तित्व त्यांनीही त्यांच्या कालावधीत तोडले नाही. मुळातच पूर्वी सातारा हा मूळ जिल्हा होता. दक्षिण सातारा व उत्तर सातारा यांचा एकत्रित सातारा होता. सातार्‍यापासून दक्षिण भाग तोडून त्याचा सांगली जिल्हा करण्यात आला आणि मूळचा सातारा आधीच छोटा झाला. आता पुन्हा सातार्‍याच्या विभाजनाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये माण-खटाव हे दोन तालुकेही येतात. माण - खटावच्या मातीचे सातार्‍याच्या मातीशी ऋणानुबंध आहेत. असे असतानाही स्वतंत्र माणदेश जिल्हा या नावाखाली नवा निकाशा सोशल मीडियावर फिरत आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील माण, खटाव. सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला, माढा अशा तालुक्यांचा समावेश असल्याचे दाखवले जात आहेत. याशिवाय स्वतंत्र बारामती जिल्ह्याची निर्मिती होणार असल्याचे सांगितले जात आहे. स्वतंत्र बारामती जिल्ह्यात सातारा जिल्ह्यातील फलटण, खंडाळा या तालुक्यांचा समावेश असल्याचे नकाशे फिरत आहेत. याबाबतचे अधिकृत स्पष्टीकरण कुठेही नाही. मात्र, सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरु आहे.

सातारा जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. क्रांतीकारकांच्या सातारा जिल्ह्याची देशभर वेगळी ओळख आहे. राज्याच्या राजकारणात आता सातार्‍याला वेगळे महत्व आहे. नव्या सरकारमध्ये सातारा जिल्ह्याचे चार मंत्री आहेत. राजकीय वर्तुळात सातार्‍याचे वजन वाढले असताना अचानक सातारा जिल्ह्याच्या विभाजनाची चर्चा होणे जनतेला अपेक्षित नाही. सातारा जिल्ह्याचे समाजमन विभाजनाच्या चर्चेने अस्वस्थ झाले आहे. सातार्‍याच्या 11 तालुक्यांचे तुकडे करुन जिल्ह्याची एकसंघता विभागून टाकण्यामागे नेमके काय राजकारण आहे? याविषयी उलटसुलट चर्चा सुरु आहे. सातारा जिल्ह्यातील चारही मंत्र्यांनी या विभाजनावर आपली मते स्पष्ट करावीत, अशी मागणी सातारा जिल्ह्यातील सामान्य जनतेने केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT