सातारा

Satara Dam Water Level: जिल्ह्यातील धरणांमध्ये 24.39 टक्के पाणीसाठा

परिस्थिती चिंताजनक : उन्हाच्या झळांनी जनजीवन होरपळले

पुढारी वृत्तसेवा

सातारा : उन्हाचे चटके असह्य झाले असतानाच जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठला आहे. पाणीसाठा खालावल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. मागील वर्षी पुरेसा पाऊस होऊनही यावर्षी तापमान वाढल्याने जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये मिळून 38.49 टीएमसी पाणीसाठा आहे. धरणांच्या साठवण क्षमतेचा विचार करता हा पाणीसाठा 24.39 टक्के इतकाच शिल्लक आहे. जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांतील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत घटल्याने पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचे संकट उभे ठाकले आहे.

जिल्ह्यातील काही पाणी प्रकल्पांमध्ये मागील वर्षीपेक्षा जादा पाणी असल्याने संबंधित लाभक्षेत्राला तात्पुरता दिलासा मिळला आहे. मात्र मोठ्या प्रकल्पांवर अवलंबून असणाऱ्या तालुक्यांत परिस्थिती बिकट आहे. कोयना धरणात 21.34 टीएमसी पाणी असून त्याची टक्केवारी 21.31 टक्के आहे. मागील वर्षी धरणात 24.45 टीएमसी पाणी होते. धोममध्ये 3.18 टीएमसी, धोम बलकवडीमध्ये 1.12 , कण्हेर धरणात 4.27 , उरमोडीमध्ये 3.85 , तारळीमध्ये 1.18 टीएमसी पाणी आहे. या मोठ्या प्रकल्पांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत दोन टीएमसी पाणी कमी आहे. बाष्पीभवनाचा वेग वाढल्यानेही पाणीपातळीत घट होत आहे.

जिल्ह्यातील 10 मध्यम प्रकल्पातही कमी पाणी आहे. येरळवाडी, नेर, राणंद, आंधळी, नागेवाडी, मोरणा-गुरेघर, उत्तरमांड, कुडाळी महू, कुडाळी हातगेघर, वांग मराठवाडी या प्रकल्पांमध्ये 3.20 टीएमसी पाणी असून त्याची टक्केवारी 39.08 इतकी आहे. या प्रकल्पांमध्ये मागील वर्षी 32.78 टक्के पाणीसाठा होता. जिल्ह्यातील 28 लघु प्रकल्पांमध्ये 0.35 टीएमसी पाणी असून त्याची टक्केवारी 19.29 इतकी आहे. जिल्ह्यात लाभक्षेत्र असलेल्या मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये सुमारे 38.39 टीएमसी पाणीसाठा आहे.

मे महिन्यातील वैशाख वणव्यात तापमान 40-42 अंश सेल्सिअरच्या पुढे गेल्याने पिण्याच्या पाण्याची प्रचंड मागणी वाढली आहे. गावोगावी नळांना पाणी येणे बंद झाले असून महिला व मुलांना पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे. पाणीपुरवठा करणारे तलाव व नद्या कोरड्या ठाक पडू लागल्याने पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या पाणी योजना धोक्यात आल्या आहेत.

शहरी भागातही पाणीपुरवठा अनियमित होत आहे. त्यामुळे नागरिकांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. खासगी टँकरचे दर गगनाला भिडल्याने सर्वसामान्य कुटुंबावर आर्थिक भार पडला आहे. सातारा शहर परिसरास पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाण्याचे स्रोत असूनही केवळ व्यवस्थापन नीट नसल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. धरणांतील कमी पाणीसाठ्यामुळे पिकांना सिंचनासाठी पाणी मिळणे कठीण झाले आहे. ऊस, द्राक्षे, डाळिंबासह इतर फळबागा आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना पाण्याअभावी पिके जगवणे मुश्कील झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT