सातारा : जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असल्यामुळे कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी व तारळी धरणात ८८ टक्के पाणीसाठा झाला आहे. कोयना धरणातून अद्यापही २४,९०८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून धरण ८८ टक्के भरले आहे. ९२.६०० टीएमसी पाणीसाठा आहे. त्याचबरोबर अन्य धरणांतूनही विसर्ग सुरू आहे. धरणात चांगल्या प्रमाणात पाणीसाठा झाला असल्याने शेतीसह पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. आगामी काळात पावसाने जोर धरल्यास लवकरच धरणे काठोकाठ भरण्याची चिन्हे आहेत.
यावर्षी धरणे पूर्ण क्षमतेने भरतील की नाही, असा प्रश्न पडला होता; मात्र जूलैमध्ये जिल्ह्यात सर्वत्रच पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार सुरू झाल्यानंतर धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत गेली. दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे धरण प्रशासनाने विसर्गही कमी केला आहे. धरणात मुबलक पाणीसाठा झाला असल्याने शेतीसह पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत झाली आहे.
कोयना धरणात उपयुक्त पाणीसाठा ८७.२६० टीएमसी असून धरण ८८ टक्के भरले आहे. धरणात ४१ हजार ८७४ क्युसेक पाण्याची आवक होत आहे, तर धरणातून २४ हजार ९०८ क्युसेक विसर्ग होत आहे. धोम धरणात उपयुक्त साठा १०.२२० टीएमसी असून धरण ८७.४३ टक्के भरले आहे.
धरणात ३ हजार ७०८ क्युसेक पाण्याची आवक होत आहे, तर धरणातून २ हजार ८८६ क्युसेक विसर्ग होत आहे. धोम-बलकवडी धरणात उपयुक्त पाणीसाठा ३.४७० टीएमसी असून धरण ८७.६३ टक्के भरले आहे. धरणात १ हजार ७२२ क्युसेक पाण्याची आवक होत आहे, तर धरणातून १ हजार ४२६ क्युसेक विसर्ग होत आहे.