Satara District Bank  
सातारा

Satara DCC Bank : खलबते सुरूच; जागा वाटपाचा मिटेना घोळ

भाजपला हव्‍यात जास्‍त जागा; राष्‍ट्रवादी - सेनेकडून नकार

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालक पदांसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच महायुतीतील प्रमुख नेत्यांची पहिली अधिकृत समन्वय बैठक गुरुवारी रात्री येथील एका हॉटेलमध्ये झाली. यावेळी दिग्गजांनी खलबते केली. मात्र, ना. जयकुमार गोरेंनी दांडी मारली. रथी-महारथींच्‍या उपस्‍थितीमधील या बैठकीत नुसतीच चर्चा झाली. भाजपला हव्‍या तेवढ्या जागा मान्‍य करण्‍यात राष्‍ट्रवादी व सेनेने नकार दिल्‍याने जागा वाटपाची बोलणी फिसकटली. खलबते सुरूच असली तरी घोळ मात्र कायम आहे.

निवडणुकीसाठी आतापर्यंत २३६ उमेदवारी अर्ज दाखल झाले असले, तरी २१ जागांचे वाटप अद्याप निश्चित झालेले नाही. त्यामुळे महायुतीतील समीकरणे आणि इच्छुकांच्या संख्येमुळे जागावाटपाचा तिढा कायम आहे. या बैठकीला भाजपचे ना. शिवेंद्रराजे भोसले, ना. मकरंद पाटील, ना. शंभूराज देसाई, खा. नितीन पाटील, आ. रामराजे नाईक-निंबाळकर, आ. धैर्यशील कदम, प्रभाकर घार्गे, अनिल देसाई तसेच अन्य प्रमुख नेते उपस्थित होते. मात्र, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे या बैठकीला अनुपस्थित राहिल्याने महायुतीतील मतभेदांबाबत राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

बँकेची निवडणूक महायुतीने एकत्रित लढवण्याची भूमिका वरिष्ठ पातळीवरून घेतली जात असली, तरी जिल्ह्यातील विविध मतदारसंघांत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार असेल, याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. काही ठिकाणी महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी परस्परांच्या उमेदवारांना आव्हान देण्याची तयारी केल्याने वरिष्ठ नेत्यांसमोर जागावाटपाचा पेच निर्माण झाला आहे.

या समन्‍वय बैठकीतून ना. शंभूराज देसाई लगबगीने बाहेर पडले, तर मला नको ना. मकरंद पाटील यांना प्रश्‍न विचारा, असे सांगत ना. देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधण्याचे टाळल्‍याने त्‍यांची नाराजी समोर दिसली. तर 'मी एकट्यानं सगळ्यांची जबाबदारी घेतलीय...नंतर बैठकीतला वृत्तांत सांगतो, अजून काही नाही, चर्चेच्‍या फेऱ्या सुरू आहेत,’ असे सांगत ना. मकरंद पाटील यांनीही पत्रकारांच्‍या प्रश्‍नांना बगल दिली.

या बैठकीला ना. जयकुमार गोरे गैरहजर राहिल्याने महायुतीतील संभाव्य मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या भूमिकेबाबत तसेच विविध मतदारसंघांतील उमेदवारीवरून महायुतीतील नेत्यांमध्ये मतभिन्नता असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत होणाऱ्या बैठकीत जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला ठरणार का?, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

मैत्रिपूर्ण लढतींवरच नेत्‍यांची भिस्‍त

निवडणुकीच्‍या निमित्ताने अडवा-अडवी अन्‌ जिरवा-जिरवीच्‍या राजकारणाला ऊत आला आहे. त्‍यातच मोजके मतदारसंघ सोडले, तर बहुतांश मतदारसंघांमध्‍ये इच्‍छुकांची संख्‍या मोठी अन्‌ त्‍यातल्‍या त्‍यात मातब्‍बरांची उमेदवारी असल्‍याने कुणाला थांबवायचे अन्‌ कुणाला लढवायचे याचे गणित काही नेत्‍यांना सुटेना झाले आहे. त्‍यामुळे लढूनच ताकद दाखवण्‍याचे मनसुबे नेत्‍यांनी आखल्‍याची जोरदार चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT