सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुती म्हणून एकत्र लढण्याचे निश्चित झाले असले, तरी जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला निश्चित झालेला नाही. या पार्श्वभूमीवर घटस्थापनेला महायुती जागा वाटपावर ‘बसणार’ आहे. येत्या रविवारी महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार असून, सर्वांना मान्य होईल, असा निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २१ ऑक्टोबरपर्यंत आहे. त्यामुळे महायुतीतील जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. मात्र, अद्याप अंतिम निर्णय न झाल्याने महायुतीतील जागावाटपाबाबत उत्सुकता कायम आहे.
याबाबत बोलताना ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, जिल्हा बँकेची निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवायची, असे ठरले आहे. जिल्हा बँकेत राजकारण आणले जाणार नाही. गेल्या दोन दिवसांपासून आपण गुजरात दौऱ्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत होतो. तसेच मंत्री मकरंद पाटील हेही साताऱ्यात नव्हते. त्यामुळे जागावाटपाबाबतची पुढील चर्चा रविवारी एकत्र बसून केली जाणार आहे. यापूर्वी प्राथमिक चर्चा झाली आहे; मात्र अंतिम फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. जागावाटपाच्या चर्चेची माहिती देताना ना. शिवेंद्रराजे म्हणाले, भाजपच्यावतीने ना. जयकुमार गोरे, आपण स्वतः, आ. डॉ. अतुल भोसले आणि आ. धैर्यशील कदम यांनी एकत्रित बैठक घेऊन चर्चा केली.
त्यानंतर महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांशी बोलणी करण्याची जबाबदारी आपल्याकडे आणि धैर्यशील कदम यांच्याकडे देण्यात आली. त्यानुसार पालकमंत्री शंभूराज देसाई, ना. मकरंद पाटील, आ. रामराजे ना. निंबाळकर यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. मात्र, जागावाटपाच्या अंतिम फॉर्म्युल्यावर अद्याप एकमत झालेले नाही. रविवारी होणाऱ्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ना. जयकुमार गोरेंना चर्चेपासून जागावाटपाच्या चर्चेत दूर ठेवले जात आहे का? असे विचारल्यानंतर ना. शिवेंद्रराजे यांनी भाजपच्या सर्व नेत्यांनी एकत्रित बैठक घेतली होती. त्यामध्ये ना. जयकुमार गोरे, आ. धैर्यशील कदम, आ. अतुल भोसले आणि आपण सहभागी होतो.
सर्वांनी मिळून आपल्याला आणि आ. धैर्यशील कदम यांना घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी पाठवले आहे. जिल्हा बँकेचा आपण सात वर्षे अध्यक्ष म्हणून काम पाहिले असून, यापूर्वीही बँकेच्या कामकाजात सक्रिय होतो. त्यामुळे या चर्चेची जबाबदारी आपल्यावर सोपवण्यात आली आहे. याचा अर्थ भाजपमधील अन्य नेते चर्चेपासून दूर आहेत, असा होत नाही. भाजपचे सर्व नेते एकत्र असून, महायुतीतील जागावाटपाबाबत समन्वयाने निर्णय घेतला जाईल, असे ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी स्पष्ट केले.