Satara DCC Bank  Pudhari photo
सातारा

Satara DCC Bank : जिल्‍हा बँकेत ‘कौन किससे भारी’

निवडणुकीचा आज फैसला : सहा टेबलांवर दोन फेऱ्यांत मतमोजणी

पुढारी वृत्तसेवा

सातारा : जिल्‍हा बँकेच्‍या निवडणुकीमध्‍ये दिग्‍गजांनी नशीब आजमावले आहे. खंडाळा, जावली, महाबळेश्‍वर, फलटण, कोरेगाव, माण, पाटण, कराड या सोसायटी मतदारसंघांमध्‍ये उभ्‍या असलेल्‍या दिग्‍गजांपैकी ‘कौन किससे भारी..’ याचा फैसला मंगळवारी होणार आहे. तर राखीव जागांवर ठरल्‍याप्रमाणे काम महायुतीच्‍या नेत्‍यांनी केले की एकमेकांचा ‘कार्यक्रम’ केला, हेही उघडकीस येणार आहे. साताऱ्यातील नागरी बँक असोसिएशनच्या सभागृहात मंगळवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. ६ टेबलांवर दोन फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण केली जाणार असून दुपारी १ पर्यंत निकालाचे चित्र स्‍पष्‍ट होईल.

बँकेसाठी रविवारी जिल्ह्यातून ९७.९२ टक्‍के मतदान झाले होते. सर्व तालुक्यांमधील मतपेट्या सातारा जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन लि., जरंडेश्वर नाका, हनुमान मंदिराजवळ, सातारा येथील मतमोजणी केंद्रावर आणल्या आहेत. या मतपेट्या सुरक्षित कक्षात ठेवल्या असून संपूर्ण परिसरावर सीसीटीव्हीची नजर आहे. मतपेट्यांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र पोलिस बंदोबस्तही तैनात आहे. मतमोजणी केंद्रात केवळ उमेदवार आणि त्यांच्या अधिकृत मतमोजणी प्रतिनिधींनाच प्रवेश दिला जाणार आहे. मतमोजणीवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाकडून पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.

जावली सोसायटीतील भाजपचे ज्ञानदेव रांजणे तर राष्‍ट्रवादीचे विठ्ठल गोळे, महाबळेश्‍वर सोसायटीत राष्‍ट्रवादीच्‍या रुपाली राजपुरे तर शिवसेनेचे संजय मोरे, कराड सोसायटीत राष्‍ट्रवादीचे उदयसिंह पाटील व भाजपचे धनंजय पाटील, पाटण सोसायटीत भाजपचे सत्‍यजित पाटणकर व शिवसेनेचे ना. शंभूराज देसाई, कोरेगावात भाजपचे सुनिल खत्री व राष्‍ट्रवादीचे सुनिल माने, माण सोसायटीत भाजपचे ना. जयकुमार गोरे, शिवसेनेचे शेखर गोरे, राष्‍ट्रवादीचे मनोज पोळ, खंडाळा सोसायटीत अपक्ष शामराव गाढवे, भाजपचे संजीव गाढवे व राष्‍ट्रवादीचे अजय भोसले, फलटण सोसायटीत शिवसेनेचे संजीवराजे ना. निंबाळकर विरुद्ध भाजपचे समशेरसिंह ना. निंबाळकर यांचे बळ आजमावले जाणार आहे.

अनुसूचित जाती मतदारसंघात माजी आमदार दीपक चव्‍हाण यांच्‍याविरोधात सत्‍यवान कांबळे यांच्‍यात लढत झाली, इतर मागासमध्‍ये राष्‍ट्रवादीचे योगेश फडतरे विरुध्‍द संदीप पाचांगणे, भटक्‍या जमातीत भाजपचे अर्जुन काळे विरुध्‍द सुनिल वाघ अशा लढती झाल्‍या आहेत, याचा दृश्‍य परिणाम निकालानंतरच समोर येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT