सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक वीज निर्मिती क्षेत्रात देखील राज्यात अग्रेसर ठरली आहे. 2023 साली बँकेच्या दोन इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्प उभारुन अवघ्या दोन वर्षांमध्ये 2 लाख 77 हजार 322 युनिट इतकी वीजनिर्मिती बँकेने केली आहे. यातून 36 लाख 60 हजार रुपयांची वीज बिलामध्ये बचत केली आहे.
सातारा जिल्हा बँकेच्या सातारा शहरात दोन प्रमुख इमारती आहेत. पोवईनाका येथे पूर्वीचे प्रशासकीय कार्यालय व बँकेची एक शाखा होती, त्या ठिकाणी आता शाखा आणि प्रशिक्षण केंद्र आहे. या इमारतीच्या छतावर 50 केव्ही क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारला. यासाठी 31 लाख 22 हजार 310 रुपयांचा खर्च आला होता. 8 जून 2023 पासून वीज विभागातर्फे नेट रिडिंग सुरू झाले. या प्रकल्पामुळे वीजबिलात 15 लाख 26 हजार 44 रुपयांची बचत झाली आहे. तर मुख्य प्रशासकीय इमारतीवर 54 लाख 15 हजार 520 रुपये खर्चून 80 केव्हीचा प्रकल्प उभारला.12 सप्टेंबर 2023 रोजी नेट मिटरिंग सुरु झाले.
या युनिटमधून एकूण 1 लाख 58 हजार 790 युनिट वीजनिर्मिती झाली आहे. यातून वीज बिलामध्ये 20 लाख 78 हजार 481 रुपयांची बचत झाली आहे. अवघ्या दोन वर्षांमध्येच एका इमारतीसाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी आलेला खर्च वीजनिर्मितीतून वसूल करण्यात आला असून दुसर्या इमारतीवरील प्रकल्पाचा खर्चही लवकरच वसूल करण्यासाठी बँकेने हालचाली सुरू केल्या आहेत.
जिल्हा बँकेला 12.83 रुपये प्रतियुनिट दराने वीज विभागाला वीज बिल भरावे लागते. सप्टेंबर 2023 ते मार्च 2024 या कालावधीत बँकेला 36 लाख 21 हजार 490 रुपयांचे वीज बिल आले होते. सौरऊर्जा प्रकल्पामुळे 11 लाख 79 हजार हजार रुपयांची बचत झाली. तर एप्रिल 2024 ते जून 2025 या कालावधीमध्ये बँकेला 83 लाख 54 हजार 851 रुपयांचे वीज बिल आले होते. या प्रकल्पामुळे या कालावधीतील वीज बिलात 24 लाख 24 हजार 893 रुपयांची बचत झाली आहे. सर्वच बाबतीत अग्रेसर असणारी ही जिल्हा बँक वीज निर्मितीत देखील राज्यात आयडॉल ठरली आहे.
जिल्हा बँकेने सौरऊर्जा प्रकल्प उभारुन वीज बिलात मोठी बचत केली आहे. आता बँकेच्या मालकीच्या जिल्ह्यातील 45 इमारतींवरही लवकरच सौरऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत. या कामाचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. आता नवीन प्रकल्पासाठी पैसे न गुंतवता संबंधित एजन्सीमार्फत प्रकल्प उभारला जाणार आहे.-डॉ. राजेंद्र सरकाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक