सातारा

Satara District Bank Polls : मकरंद पाटलांच्या कार्यकर्त्याला चोपले, सातारा जिल्‍हा बँक मतदानावेळी खंडाळ्‍यात तुफान राडा

राष्‍ट्रवादी-भाजप भिडली, पाटील - गोरे वादाचा भडका उडणार

पुढारी वृत्तसेवा

लोणंद : सातारा जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेच्‍या मतदानावेळी खंडाळ्यात तुफान राडा झाला. मतदानासाठी आलेल्‍या मंत्री. मकरंद पाटील यांच्‍या कार्यकर्त्याने भाजप कार्यकर्त्याला ‘चोर चोर’ अशी शेरेबाजी केली. यामुळे संतप्‍त झालेल्‍या भाजपच्‍या कार्यकर्त्यांनी राष्‍ट्रवादीच्‍या कार्यकर्त्याला ताणून ताणून चोपले.

या घटनेवरून राष्‍ट्रवादी कार्यकर्ते व भाजप कार्यकर्त्यांमध्‍ये तुंबळ जुंपली. मंत्री मकरंद पाटील आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्‍या कार्यकर्त्यांमध्‍ये झालेल्‍या या राड्याने खंडाळ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्‍यान जिल्‍हा बँकेसाठी तालुक्‍यात १०० टक्‍के मतदान झाले.

जिल्‍हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या मतदारांना सहलीवर पाठवले होते. रविवारी सकाळी ११.३० च्या सुमारास ना. मकरंद पाटील स्वतः महाबळेश्वर येथून मतदारांना घेऊन मतदान केंद्रावर दाखल झाले. यानंतर दुपारी दीडच्‍या सुमारास ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनीही फलटणहून भाजपच्या मतदारांना खंडाळ्यातील छत्रपती शिवाजी चौकापर्यंत आणले.

परंतु, मतदान केंद्रावर येणे त्यांनी टाळले. त्यानंतर मिनी बसने हे मतदार मतदान केंद्रावर दाखल झाले. ही मिनी बस प्रशासकीय इमारतीच्‍या बाहेर थांबली होती. या बसमधून भाजपचे मतदार उतरले. या बसशेजारीच राष्‍ट्रवादीचे दोन कार्यकर्ते होते. यातील एकाने भाजपच्‍या पदाधिकार्‍यांना उद्देशून ‘चोर चोर’ अशी शेरेबाजी केली.

‘चोर चोर’ असे म्‍हटल्‍यामुळे भाजपचे कार्यकर्ते संतप्‍त झाले. चोर म्‍हंटल्‍यानंतर राष्‍ट्रवादीचा कार्यकर्ता पळत सुटला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्‍याला ताणून ताणून चोप दिला. भाजप कार्यकर्त्यांनी राष्‍ट्रवादीच्‍या कार्यकर्त्याची गचुंडी धरत बुकला बुकली केली. ही हाणामारी होत असतानाच पोलिसांनी हस्‍तक्षेप करत दोन्‍ही बाजूच्‍या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. यामुळे मतदान केंद्रावर एकच पळापळ झाली. जवळपास १० ते १५ मिनीटे हा तुफान राडा सुरूच होता.

पाटील - गोरे वादाचा भडका उडणार

जिल्‍हा परिषद निवडणुकीत ना. मकरंद पाटील यांच्‍या मतदारसंघात भाजपचा सदस्‍य निवडून आणून ना. जयकुमार गोरे यांनी धोबीपछाड दिला होता. त्‍यानंतर वाई नगरपालिका आणि आता जिल्‍हा बँक निवडणुकीसाठी महायुतीतील हे दोन मंत्री समोरासमोर उभे ठाकले आहेत. दोन्‍ही मंत्र्यांनी एकमेकांवर टोकाची टीका केली होती. मात्र, धराधरी आणि मारामारीचा प्रकार घडला नव्‍हता. मात्र, जिल्‍हा बँक मतदानावेळी राष्‍ट्रवादीच्‍या कार्यकर्त्याला हाणल्‍याने राष्‍ट्रवादीची अब्रू वेशीला टांगली गेली आहे. ही केवळ संघर्षाची नांदी आहे. या घटनेनंतर ना. पाटील विरुद्ध ना. गोरे या वादाचा भडका उडाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT