सातारा

Satara Politics : पालकमंत्र्यांनी घेतली माजी मुख्यमंत्र्यांची भेट

पृथ्वीराज चव्हाण, शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत जिल्हा बँकेच्या राजकीय घडामोडीला महत्त्व

पुढारी वृत्तसेवा

सणबूर : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला असून, शिवसेनेचे उमेदवार तथा माजी आमदार दीपक प्रल्हाद चव्हाण यांना अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले रवींद्र सर्जेराव बडेकर (मुंढे, ता. कराड) यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याणमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत घडलेल्या या राजकीय घडामोडीला जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पुढाकाराने बडेकर यांनी दीपक चव्हाण यांच्या उमेदवारीला स्वखुशीने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. वैयक्तिक कारणांमुळे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेत अर्ज मागे घेता आला नसल्याने, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत चव्हाण यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील महत्त्वाची संस्था आहे. त्यामुळे या बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

अशा परिस्थितीत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मतदारसंघातील उमेदवार रवींद्र बडेकर यांनी दीपक चव्हाण यांना दिलेला पाठिंबा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या निर्णयामुळे चव्हाण यांच्या उमेदवारीला राजकीय बळ मिळण्यास मदत होऊ शकते. विशेषतः पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पुढाकारातून झालेल्या या घडामोडीचे निवडणुकीतील पुढील समीकरणांवर काय परिणाम होतात, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

आता या पाठिंब्याचा प्रत्यक्ष मतदानावर किती परिणाम होतो आणि दीपक चव्हाण यांच्या उमेदवारीला त्यातून किती बळ मिळते, हे निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होणार आहे. त्‍यामुळे या राजकीय घडामोडीनंतर निवडणूकीवर काय परिणाम होणार याबाबत उत्‍सुकता निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT