सातारा

Devendra Fadnavis | सातारा जिल्हा बँकेचा पूरग्रस्तांसाठी मोठा हातभार: ना. देवेंद्र फडणवीस

राज्यातील पूरग्रस्तांना सव्वा कोटीची मदत

पुढारी वृत्तसेवा

सातारा : राज्यात उद्भवलेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे नागरिक आणि कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. या आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्या मदतीसाठी आणि पुनर्वसनासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने केलेल्या मदतीमुळे पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मोठा हातभार लागला आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

राज्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटी 22 लाख 56 हजार 599 रुपयांची भरीव मदत केली आहे. या मदतीचा धनादेश मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, ना. अजितदादा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बँकेचे अध्यक्ष खा. नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक राजेंद्र राजपुरे, प्रदीप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

यावेळी ना. अजितदादा पवार म्हणाले, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिलेली ही भरीव मदत आहे. पूर असो वा इतर कोणतीही नैसर्गिक आपत्ती, महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या मदतीसाठी सातारा जिल्हा बँक राज्यातच नव्हे, तर देशभरात आपल्या आदर्श कार्य प्रणालीसाठी ओळखली जाते. ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, बँकिंग कामकाजाबरोबर जिल्ह्यातील विकासाभिमुख कामात बँक नेहमीच अग्रेसर आहे. महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील बाधितांना मदत करण्यासाठी बँक मदतीला धावली आहे, ही सातारा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.

ना. मकरंद पाटील म्हणाले, सातारा जिल्हा बँकेने पूर परिस्थितीत दाखवलेली ही संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी अत्यंत महत्त्वाची आहे. याच भावनेतून बँकेने आजपर्यंत विविध प्रकारे सर्वतोपरी मदत केलेली आहे. खा. नितीन पाटील म्हणाले, बँकेमार्फत 1 कोटी तसेच बँक अधिकारी व सेवक यांच्या एक दिवसाची पगाराची रक्कम आणि संचालक यांची एका सभा भत्त्याची अशी एकूण 1 कोटी 22 लाख 56 हजार 599 इतकी रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आली. डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, सातारा जिल्हा बँकेची सामाजिक बांधिलकी केवळ आताच्या पूरग्रस्तांच्या मदतीपुरतीच मर्यादित नाही, तर बँकेने यापूर्वीही महाराष्ट्रासह संपूर्ण देशात जेव्हा-जेव्हा नैसर्गिक आपत्ती आली आहे, तेव्हा-तेव्हा आपला मदतीचा हात पुढे केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT