Satara District Bank  
सातारा

Satara District Bank Election : सोसायट्यांत ‘निकाली’ तर राखीव जागांवर ‘नुरा कुस्त्या’

जिल्हा बँक निवडणुकीत मुरलं पाणी; माघारीवेळी गायब झालेले उमेदवार अवतरले नेत्यांसमोर

पुढारी वृत्तसेवा
सागर गुजर

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने बहुतांश जागांवर मनोमिलन घडवून आणण्याचा प्रयत्न केला असला, तरी सोसायटी मतदारसंघांत मात्र राजकीय रथी-महारथींमध्ये जोरदार संघर्ष रंगणार आहे. दुसरीकडे राखीव मतदारसंघांत उमेदवारी अर्ज माघारीच्यावेळी चर्चेत आलेले आणि नेत्यांना न सापडलेले उमेदवार आता वेगवेगळ्या नेत्यांच्या उपस्थितीत प्रतिस्पर्ध्यांना पाठिंबा देताना दिसत आहेत. माघारीनंतर बरेच पाणी मुरले अन्‌ पलायन केलेले उमेदवार पाठिंब्‍यासाठी अवतरले. या परिस्‍थितीत सोसायटी मतदारसंघांत 'निकाली', तर राखीव मतदारसंघांत 'नुरा कुस्त्या' सुरू झाल्‍या आहेत.

जिल्हा बँकेच्या २१ संचालक पदांपैकी नऊ जागांवर बिनविरोध निवड झाली आहे. खरेदी-विक्री संघातून ना. मकरंद पाटील, वाई सोसायटी मतदार संघातून सत्‍यजित वीर, साताऱ्यातून सर्जेराव सावंत आणि खटावमधून नंदकुमार मोरे बिनविरोध निवडून आले आहेत. महिला राखीव मतदारसंघातून ऋतुजा पाटील आणि मंगल पाटील, गृहनिर्माणमधून काका धुमाळ, प्रक्रिया मतदारसंघातून आ. डॉ. अतुल भोसले, तर नागरी बँका व पतसंस्था मतदारसंघातून माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी बिनविरोध विजय मिळवला आहे. उर्वरित १२ जागांसाठी निवडणुकीची रणधुमाळी रंगणार असून काही जागांवर औपचारिक लढती पार पडणार आहेत.

सातारा, वाई, खटाव हे सोसायटी मतदारसंघ बिनविरोध झाल्‍यानंतर खंडाळा, महाबळेश्‍वर, कोरेगाव, फलटण, माण, कराड, जावली आणि पाटण या तालुका सोसायटी मतदारसंघांमधील लढतींकडे लक्ष लागले आहे. या मतदारसंघांमधील लढती या विधानसभेच्‍या 'रंगीत तालीम' ठरणार आहेत. राखीव मतदासंघांमध्‍ये मात्र 'नुरा कुस्‍त्‍या' रंगणार आहेत.

औद्योगिक विणकर-मजूर मतदार संघात ना. शिवेंद्रराजे गटाचे जि. प. उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांच्या विरोधात सुनील वाघ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज माघारीच्या दिवशी वाघ यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न झाले. मात्र, त्यांचा अर्ज कायम राहिल्याने या जागेवर निवडणूक लागली. त्यानंतर वाघ यांनी सुरुची बंगल्‍यावर जाऊन ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत जाधव यांना पाठिंब्याचे पत्र दिले. त्यामुळे निवडणुकीचे चित्र बदलले. जाधवांची डोकेदुखी दूर झालेली आहे.

इतर मागास प्रवर्ग मतदार संघामध्‍ये राष्‍ट्रवादीने योगेश फडतरे यांना संधी दिलेली आहे. त्‍यांच्‍याविरोधातील इतर उमेदवारी अर्ज मागे घेतले असले तर संदीप पाचांगणे या उमेदवाराचा अर्ज असल्‍याने या ठिकाणीही लढत होणार आहे.

अर्जुन काळेंना सुनिल वाघांचे आव्‍हान

भटक्या-विमुक्त जाती मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अर्जुन काळे यांच्या विरोधात सुनील वाघ यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. वाघ यांनी औद्योगिक विणकर-मजूर मतदारसंघात चंद्रकांत जाधव यांना पाठिंबा दिला असला, तरी काळे यांच्याविरोधातील अर्ज कायम ठेवल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. काळे हे ना. जयकुमार गोरे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील घडामोडींमागे काही राजकीय गणिते आहेत का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT