Satara District Bank  
सातारा

Satara District Bank Election : कुणाला किती जागा, यावरूनच नेत्यांमध्ये चर्चांचा काथ्याकूट सुरू

निर्णय घेणारे नेते मुंबईत; समीकरणांची चर्चा साताऱ्यात

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सर्वच राजकीय पक्षांमधील रथी-महारथींना सातारा जिल्हा बँकेमध्ये यायचे असल्याने कोणाला किती जागा, यावरूनच चर्चांचा काथ्याकूट सुरू झाला आहे. महायुतीमध्ये जागा वाटपावरून बोलणी पुढे सरकलेली नाहीत. त्यातच निर्णय घेणारे प्रमुख नेते मंगळवारी मुंबईला गेल्याने दिवसभर साताऱ्यात समीकरणांच्याच चर्चा सुरू होत्या.

बँकेत महायुती आकाराला आणण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना भाजपने निर्णयाचे अधिकार दिल्याने ते पुढाकार घेत आहेत. राष्ट्रवादीचे नेते मकरंदआबा पाटील व विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे ना. निंबाळकर यांच्याशी त्यांची प्राथमिक बोलणी झाली; मात्र निर्णायक तोडगा निघाला नाही. त्यातच मंगळवारी कॅबिनेट मिटिंग असल्याने शिवेंद्रराजे व मकरंदआबा यांना मुंबईला जावे लागले. त्यामुळे मंगळवारी साताऱ्यात बैठक झाली नाही; मात्र समीकरणांच्या चर्चा झाल्या.

बँकेत प्रत्येक महारथीला यायचे आहे आणि जागा कमी आहेत. त्यामुळे कुणाला कुठे ॲडजेस्ट करायचे? महायुतीत पक्षीय जागा वाटप करायचे की नेतानिहाय जागा वाटप करायचे? मंत्री म्हणून जागा वाटप करायचे की मतदार संख्या समोर ठेवून जागा वाटप करायचे, यावर ऊहापोह सुरू आहे. ती कोंडी पुन्हा एकत्र बसल्यानंतरच सुटणार आहे; मात्र तोवर सावधगिरीचा मार्ग म्हणून प्रत्येक पक्षातले बलाढ्य नेते स्वत: व सहकाऱ्यांचेही उमेदवारी अर्ज भरत आहेत. मातब्बरांपैकी खा. उदयनराजे भोसले, आ. रामराजे ना. निंबाळकर, आ. मनोज घोरपडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. कोणाला किती जागा द्यायच्या, यावरून अंदाज व आडाखे बांधले जात आहेत.

११ सोसायटी मतदारसंघांमध्ये समोरासमोर मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत. त्यात ज्याच्यांकडे सोसायट्या जास्त तो विजयी होईल. मात्र, उरलेल्या १० मतदारसंघांमध्ये समेटाची बोलणी करून जागा वाटप करण्याच्या हालचाली सुरू आहेत. उरलेल्या १० मतदारसंघांमध्ये खरेदी -विक्री संघ, गृहनिर्माण-पाणीपुरवठा मतदारसंघ, कृषी प्रक्रिया मतदारसंघ, अनुसूचित जाती मतदारसंघ, विजाभज मतदारसंघ, ओबीसी मतदारसंघ, मजूर व औद्योगिक मतदारसंघ, नागरी बँका, पतसंस्था मतदारसंघ यातून प्रत्येकी एक व महिला मतदारसंघातून दोन अशा १० जागांसाठी खल सुरू आहे. गतवेळचे मतदारसंघ संबंधित नेत्यांकडे तसेच ठेवायचे की त्यात बदल करायचा, यावरही चर्चा होणा आहे. गत निवडणुकीत शिवेंद्रराजे, मकरंदआबा व रामराजे यांच्यात वरच्या जागांवर वाटप झाले होेते.

आता तिघांना भाजपचे खासदार असलेल्या उदयनराजे भोसले, ग्रामविकासमंत्री असलेले जयकुमार गाेरे, पालकमंत्री शंभूराज देसाई, राष्ट्रवादीचे खासदार नितीनकाका पाटील, आ. डॉ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे, आ. महेश शिंदे, आ. धैर्यशील कदम, माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर यांचाही सन्मान विचारात घ्यावा लागणार आहे. त्यामुळे तारेवरची कसरत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT