जिल्हा बँकेसाठी ईर्ष्येने ९७.९२ टक्‍के मतदान 
सातारा

Satara DCC Bank Election : जिल्हा बँकेसाठी ईर्ष्येने ९७.९२ टक्‍के मतदान

सर्वच सोसायटी मतदार संघात चुरस : उद्या निकाल

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्हा बँकेच्या सत्तेचा फैसला करण्यासाठी रविवारी जिल्हात ईर्ष्येने ९७.९२ टक्‍के मतदान झाले. २०२१ पैकी १९७९ मतदारांनी मतदान केले. तर ४२ उमेदवारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला नाही. खंडाळ्यात मतदानावेळी दोन गटांत राडा झाला. भाजप व राष्‍ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले. यामुळे निवडणुकीला गालबोट लागले. इतर तालुक्‍यांमध्‍ये मात्र शांततेत मतदान झाले. जावली, महाबळेश्वर, कराड, पाटण, कोरेगाव, माण, खंडाळा आणि फलटण या तालुक्यांतील सोसायटी मतदारसंघांत चुरस पाहायला मिळाली. २४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून ३ नोव्हेंबरच्या मतमोजणीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

बँकेच्या २१ संचालकांच्या जागांपैकी ९ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित १२ जागांसाठी मतदान प्रक्रिया झाली. सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ८ ते दुपारी १२ या कालावधीत ६१.५० टक्‍के मतदान झाले. अनेक ठिकाणी केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागल्‍या होत्‍या. दुपारी २ पर्यंत ८८.५० टक्‍के मतदान झाले. दुपारी ४ पर्यंत ९६ टक्‍के मतदान पूर्ण झाले होते. तर उरलेल्‍या एका तासात १ टक्‍का मतदान वाढून एकूण ९७.९२ टक्‍के मतदान झाले. या निवडणुकीत २ हजार २१ मतदार निर्णायक भूमिका बजावणार असल्याने प्रत्येक मताला महत्त्व प्राप्त झाले आहे.

मतदानासाठी जिल्ह्यातील ११ तालुक्यांत प्रत्येकी एक मतदान केंद्र निश्‍चित केले होते. विशेषतः सोसायटी मतदारसंघांतील लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जावली, महाबळेश्‍वर, कराड, पाटण, कोरेगाव, माण, खंडाळा आणि फलटण या तालुक्यांत स्थानिक नेत्यांनी आपापल्या उमेदवारांसाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. राजकीय हालचालींमुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. काही मतदारांना सहलीवर नेल्याच्या चर्चांमुळे निवडणूक रंगतदार बनली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT