सातारा

Satara District Bank Election : खा. उदयनराजे, नितीन पाटील होणार बिनविरोध

छाननीत १२ अर्ज बाद : १६२ उमेदवारांचे अर्ज वैध

पुढारी वृत्तसेवा

सातारा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आणि खा. नितीन पाटील यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला. उदयनराजे यांच्या विरोधातील गृहनिर्माण दूध मतदारसंघात डी. के. पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला तर खा. नितीन पाटील यांच्या विरोधात वाई सोसायटी मतदारसंघातील भाजपचे दीपक नानावरे यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज कर्जाची थकबाकी असल्याने बाद ठरला. उदयनराजे व नितीन पाटील यांनी समर्थकांचे डमी अर्ज कायदेशीर प्रक्रिया समोर ठेवून तसेच ठेवले आहेत. त्यामुळे या दोन्ही खासदारांची बिनविरोध निवड निश्‍चित झाली.

बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात नामनिर्देशनपत्रांची छाननी प्रक्रिया झाली. निवडणूक विभागाने मंगळवारी छाननीचा निकाल जाहीर केला. यामध्ये विविध कारणांमुळे १२ उमेदवारांचे अर्ज बाद ठरले. त्यामध्ये विद्यमान संचालक लहुराज जाधव तसेच माजी संचालक प्रकाश बडेकर यांच्या अर्जांचा समावेश आहे. अर्ज बाद झाल्यानंतर रिंगणातील उमेदवारांची संख्या १६२ झाली आहे.

गृहनिर्माण व दूध मतदारसंघातून उदयनराजे यांच्या विरोधात डी. के. पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांनी अर्ज मागे घेतला. अर्ज मागे घेतल्यानंतर डी. के. पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचा मान राखायचा म्हणून मी उदयनराजे यांच्या विरोधातील अर्ज मागे घेतला आहे. मागील निवडणुकीतही मी अर्ज काढून घेतला होता. उदयनराजेंचा मान मी राखला आहे, असे सांगितले. तर याच मतदारसंघात उदयनराजेंचे समर्थक काका धुमाळ यांचा डमी अर्ज असला तरी धुमाळ हेही अर्ज काढून घेणार असल्‍याने उदयनराजेंचा मार्ग मोकळा झाला आहे.

खा. नितीन पाटील यांच्या विरोधात भाजपकडून दीपक ननावरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, कर्जाची थकबाकी असल्याचे कारण पुढे आल्याने त्यांचा अर्ज बाद ठरवला. त्यामुळे खा. नितीन पाटील यांचाही मार्ग बिनविरोध निवडीसाठी मोकळा झाला. ननावरे यांचा अर्ज बाद होणे हा भाजपचे नेते ना. जयकुमार गोरे यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

बँकेचे अध्‍यक्ष. खा. नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक राजेंद्र राजपुरे आणि रुपाली राजपुरे यांच्या उमेदवारीविरोधात दाखल केलेल्या हरकतीही निवडणूक विभागाने फेटाळून लावल्या. त्यामुळे या उमेदवारांच्या उमेदवारीवर असलेले आक्षेप दूर झाले असून त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. छाननीदरम्यान विविध उमेदवारांच्या अर्जांवर हरकती घेतल्याने यशवंतराव चव्हाण सभागृहात साडेतीन तास कायदेशीर काथ्याकूट झाला होता. निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रिक यांच्या उपस्थितीत हरकतींवर सुनावणी झाली. त्यानंतर अर्जांची वैधता निश्‍चित केली.

नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेनंतर निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. छाननीपूर्वी मोठ्या संख्येने उमेदवार रिंगणात होते. मात्र १२ अर्ज बाद झाले तसेच एकाने माघार घेतल्‍याने आता १६२ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. त्यातच दोन खासदारांची बिनविरोध निवड निश्‍चित झाल्याने बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांना वेगळे वळण मिळाले आहे. आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत कोण कोण माघार घेतो, कोणत्या मतदारसंघात थेट लढती होतात आणि महायुतीतील जागावाटपाचा फॉर्म्युला प्रत्यक्षात कसा उतरतो, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

अर्ज बाद ठरलेले उमेदवार व कारणे

जातीचा दाखला जोडला नसल्‍याने बाळकृष्‍ण काळे, महिला प्रतिनिधी समिती सदस्‍यांची नावांची यादी न जोडल्‍याने दीपाली साळुंखे, थकबाकी थकीत ठेवल्‍याने सचिन माळी, जगदीश जगताप, भटक्‍या विमुक्‍यांच्‍या जाती समितीवरील संचालक मंडळाची यादी न जोडल्‍याने लहुराज जाधव, पराग रामगुडे व रामचंद्र ढेकळे, सूचक व अनुमोदक इतर मतदारसंघातील घेतल्‍याने प्रकाश बडेकर, सूचक नसल्‍याने सुरभी भोसले यांचा नागरी बँका मतदार संघातील अर्ज बाद झाला. दोन वर्ष सभासद नसल्‍याने खंडाळा सोसायटी मतदारसंघातून संतोष साळुंखे यांचा अर्ज बाद झाला. साळुंखे हे खंडाळा सोसायटी मतदारसंघातून अधिकृत उमेदवार होते. ना. मकरंद पाटील यांनी मातब्बरांना डावलून त्यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद होणे ही मकरंद पाटील यांच्यासाठीसुद्धा नामुष्की ठरली. सुरभि भोसले यांचा एक अर्ज बाद झाला असला तरी महिला प्रतिनिधी मतदार संघातील त्यांचा अर्ज वैध ठरला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT