Satara District Bank Pudhari Photo
सातारा

Satara District Bank : हुश्श... ठराव झाले; आता वेध निवडणुकीचे

जिल्हा बँकेसाठी प्रतिष्ठा पणाला; आगामी काळात रणांगण आणखी तापणार

पुढारी वृत्तसेवा

सातारा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राबवलेली ठराव प्रक्रिया अखेर बुधवारी पूर्णत्वाला गेली. कराड, जावलीसह अन्य तालुक्यांतही ठरावासाठी चांगलेच राजकारण तापले. आता ठराव झाले असून निवडणुकीचे वेध लागले आहेत. मंगळवारअखेर मिळालेल्‍या आकडेवारीनुसार जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी एकूण १,८९४ ठराव जिल्‍हा उपनिबंधकांकडे दाखल झाले आहेत.

यंदाची जिल्हा बँकेची निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. भाजपच्या नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विविध मतदारसंघांतील संस्थांकडून ठराव मंजूर करून घेण्यासाठी अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर राजकीय हालचाली झाल्या.

मतदार निश्‍चितीच्या प्रक्रियेदरम्यान विविध संस्थांमध्ये ठराव मंजूर करून घेण्यासाठी प्रमुख नेत्यांनी लक्ष घातले. अनेक ठिकाणी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधत प्रभाव आणि संघटनात्मक ताकद वापरल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे मतदार निश्‍चितीची प्रक्रिया ही केवळ प्रशासकीय न राहता राजकीय शक्तिप्रदर्शनाची रंगीत तालीम ठरली.

आता मतदार यादी निश्‍चित झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची उत्सुकता वाढली आहे. जिल्हा बँकेवर सत्ता मिळवण्यासाठी महायुती आणि विरोधी गटांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून, उमेदवारीपासून ते प्रचारापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

जिल्‍हा बँकेमध्‍ये २१ संचालक निवडून द्यायचे आहेत. त्‍यामध्‍ये जिल्‍ह्यातील ११ तालुक्‍यांतील विकास सेवा सोसायट्यांमधील ११, खरेदी-विक्री संघ १, सहकारी साखर कारखाने, सूतगिरणी १, नागरी बँका व पतसंस्‍था १, गृहनिर्माण संस्‍था व दूध संस्‍था १, औद्योगिक विणकर, मजूर फेरडरेशन १ तसेच महिला राखीव २, ओबीसी १, भटक्‍या जमाती १, अनुसूचित जाती-जमाती १ असे २१ संचालक निवडून द्यायचे आहेत.

यामध्‍ये खरेदी-विक्री संघातून ११, सहकारी साखर कारखाने, सूतगिरणीचे २६, नागरी बँका, पतसंस्‍थांचे ३३५, गृहनिर्माण संस्‍था, दूध संस्‍थांचे २६३, औद्योगिक विणकर, मजूर फेडरेशनचे ३०४, विकास सेवा सोसायट्यांचे ९५५ असे मिळून १,८९४ ठराव दाखल झाले आहेत.

विभागीय सहनिबंधक मतदार यादी निश्‍चित करणार

निवडणुकीच्‍या अनुषंगाने तयार केलेले ठराव विभागीय सहनिबंधकांकडे पाठवले जाणार आहेत. ते मतदार यादी तयार करणार असून त्‍यावर हरकती व सूचना घेणार आहेत. त्‍यानंतर अंतिम मतदार यादी जाहीर केली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT