Satara District Bank Pudhari
सातारा

Satara District Bank Election | महायुतीत भाजपाकडून शिवेंद्रराजे चर्चा करत होते : ना. जयकुमार गोरे

कोणतीच निवडणूक अंतिम नसते, आगे आगे देखो होता है क्या

पुढारी वृत्तसेवा

सातारा : अध्यक्षपदाचा निर्णय कुठे झाला याची कल्पना मला नाही. त्याबाबत सर्व अधिकार आम्ही शिवेंद्रराजेंना दिले होते. शिवेंद्रराजेंनी घटक पक्षांशी काय चर्चा केली हे माझ्यापेक्षा तेच अधिक सांगू शकतात. महायुतीच्या कुठल्याही चर्चेमध्ये जयकुमार कधीही नव्हता. बाकीचा विषय काहीही झाला असला तरी ज्या काही चर्चा झाल्या असतील त्या शिवेंद्रराजे व इतर महायुतीच्या घटक पक्षांना माहित असतील, असा गौप्यस्फोट राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत केला. कोणतीही निवडणूक अंतिम नसते. आगे आगे देखो होता है क्या! असा सूचक इशारा त्यांनी विरोधी पक्षाला दिला.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत चेअरमन-व्हाईस चेअरमन निवड प्रक्रिया बुधवारी दुपारी पार पडली. त्यानंतर मंत्री जयकुमार गोरे यांना जिल्हा बँकेचा अध्यक्ष मुख्यमंत्री ठरवतील. भाजपाचाच अध्यक्ष होईल असे तुम्ही म्हणाला होतात, असे विचारले असता ते म्हणाले, जिल्हा बँकेत अध्यक्ष महायुतीचा झाला आहे. उदय उंडाळकर यांना चेअरमन म्हणून शुभेच्छा आहेत. त्यांच्या कालखंडात बँक चांगली चालावी, अशी अपेक्षा आहे. मी भाजपाचा कार्यकर्ता म्हणून निवडणुकीत इतर कार्यकर्ते व नेत्यांच्या पाठीशी ठाम उभा राहिलो. निवडणूक लढलो. बँकेत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष असल्याने कार्यकर्ता म्हणून बँकेत भाजपाचा अध्यक्ष व्हावा, ही साहजिकच अपेक्षा होती. त्यामध्ये चुकीचे काय आहे? हम सब एक है, डोन्ट वरी, असे ते म्हणाले.

जिल्हा बँकेच्या पदाधिकारी निवड प्रक्रियेवर नाराज तुम्ही नाराज आहात का? असे विचारले असता मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, नाराज असण्याचे कारण नाही. ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांचा अध्यक्ष झाला आहे. बहुमत महायुतीसोबत आहे. जिल्हा बँकेचे काम उत्तमपद्धतीने चालेल. जिल्हा परिषदेचा वचपा काढला अशी चर्चा सुरु झाली आहे, याबाबत विचारले असता मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, कुणी कशाचा वचपा काढला हा आजचा विषय नाही. जिल्हा परिषदेची निवडणूक वेगळी होती. त्याला कारण वेगळं घडलं होतं. ही निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढली होती. आम्ही महायुती म्हणूनच जिल्हा बँकेत एकत्र आहोत. बाकी गोष्टी ऑफ द रेकॉर्ड आहेत. त्यावर अधिक बोलणं उचित नाही. परंतु एक मात्र निश्चित आहे की, कोणतीही निवडणूक अंतिम नसते. आगे आगे देखो होता है क्या! असा सूचक इशारा त्यांनी दिला.

जिल्हा बँकेच्या नूतन पदाधिकार्‍यांना किती वर्षे संधी असेल, फॉर्म्युला काय ठरला? याबाबत विचारले असता मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, महायुती तसेच फॉर्म्युल्याच्या चर्चेत मी कधीही नव्हतो. महायुतीच्या चर्चेत शिवेंद्रराजे होते. त्यामुळे जो काय फॉर्म्युला ठरला असेल तो शिवेंद्रराजेंना माहित असेल. मला कुठलाही फॉर्म्युला माहित नाही. महायुतीच्या कुठल्याही प्रक्रियेत मी नव्हतो. निवडणुकीत महायुतीने मला मतदान केले नाही. आम्ही सोसायटीच्या निवडणुका वेगळ्या लढवल्या होत्या. या निवडणुकीत आपापली मते मिळाली. त्यानंतर राखीव मतदारसंघातील जागांची निवडणूक प्रक्रिया पार पडली. पुन्हा पुन्हा त्या विषयावर काय चर्चा करायची? असा सवाल त्यांनी केला.

मंत्री शिवेंद्रराजे व मंत्री शंभूराज देसाई हे अध्यक्षपदाचा निर्णय स्थानिक पातळीवरच होईल. तसे न झाल्यास वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल, असे म्हणाले होते, याकडे लक्ष वेधले असता ना. जयकुमार गोरे म्हणाले, अध्यक्षपदाचा निर्णय कुठे झाला याची कल्पना मला नाही. ते सर्व अधिकार आम्ही शिवेंद्रराजेंना दिले होते. शिवेंद्रराजेंनी त्यांच्याशी काय चर्चा केली हे माझ्यापेक्षा तेच अधिक सांगू शकतात. महायुतीच्या कुठल्याही चर्चेमध्ये जयकुमार कधीही नव्हता. महायुती धर्म पाळण्यात पुढे होतो. बाकीचा विषय काहीही झाला असला तरी ज्या काही चर्चा झाल्या असतील त्या शिवेंद्रराजे व महायुतीच्या इतर घटक पक्षांना माहित असतील. मला त्यासंदर्भातील काहीही माहिती नाही. जिल्हा बँकेची निवडणूक महायुती म्हणून लढल्यावर त्यांना बाजूला कसे करणार? भाजपाकडून जिल्हा बँकेबाबत महायुती म्हणून चर्चा करण्याचे अधिकार शिवेंद्रराजेंना देण्यात आले होते. त्यामुळे काय चर्चा झाली? महायुतीमध्ये काय घडलं? किंवा कुठला अध्यक्ष करायचं ठरलं हे शिवेंद्रराजे यांच्याशी चर्चा करुन झालं असेल. मी यासंदर्भातील माहिती घेण्याचा प्रयत्न केला नाही. महायुती म्हणून माझ्यावर असलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. महायुतीचा जो निर्णय झाला त्याची माहिती महायुतीतील घटक पक्षांना असेल, असे त्यांनी सांगितले.

जिल्हा बँकेच्या अनुषंगाने झालेल्या बैठकांमध्ये तुम्हाला बाजूला ठेवण्याचे कारण काय? असे विचारले असता ना. जयकुमार गोरे म्हणाले, जिल्हा बँकेसंदर्भात मला बाजूला ठेेवण्याचा बिलकूल संबंध नव्हता. मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाली होती. भाजपाच्यावतीने शिवेंद्रराजे चर्चा करतील असे आमच्या बैठकीत ठरले होते, असे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेची नाराजी असल्याने राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र आली का? असे विचारले असता ना. जयकुमार गोरे म्हणाले, जिल्हा परिषदेची निवडणूक वेगळी होती. त्याची नाराजी असू शकते. बँकेची निवडणूक महायुती म्हणून लढली गेली. त्यामुळे त्यावर चर्चा करणे उचित नाही. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक रणजितसिंह नाईक निंबाळकर, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT