सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. शुक्रवारपासून ( दि. २५) अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. १ नोव्हेंबर रोजी मतदान, तर ३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर होईल. त्यामुळे आगामी काळात संचालकांच्या निवडीसाठी मोर्चेबांधणीला वेग येणार आहे.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार निवडणुकीसाठी २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. ५ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजता अर्जांची छाननी होईल. ६ ऑक्टोबर रोजी पात्र अर्जदारांची नावे निवडणूक कार्यालयात नोटीस बोर्डवर लावण्यात येणार आहेत. त्यानंतर ६ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत सकाळी ११ ते दु. ३ यावेळेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. २२ ऑक्टोबरला निवडणूक चिन्हांचे वाटप होईल.
त्यानंतर प्रत्यक्ष प्रचाराला रंग चढणार असून जिल्हा बँकेच्या सत्तेची गणिते स्पष्ट होण्यास सुरुवात होणार आहे. १ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजयकुमार सुद्रिक हे काम पाहणार आहेत.
बँकेवर गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, यावेळी भाजपकडून शत-प्रतिशत भूमिका घेतली जात असल्याने निवडणुकीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. ना. शिवेंद्रराजे भोसले, ना. जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सहकारातील ताकद वाढवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
शेतकरी, सभासद, ठेवीदार, कर्जदार, सामान्य खातेदार यांचा हिताचा विचार करून डीसीसी बँक राजकारण विरहित ठेवावी, यासाठी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आग्रही आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही बँकेवरील पारंपरिक वर्चस्व कायम ठेवण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. सर्वपक्षीय पॅनेलच्याही हालचाली सुरू झाल्या असून अर्जानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणुकीसाठी २०१९ मतदार आहेत. २१ संचालकांच्या निवडीसाठी ही निवडणूक होणार आहे. दिवाळीपूर्वी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर दिला आहे.- डॉ. महेश कदम, विभागीय सहनिबंधक, कोल्हापूर