सातारा

Satara District Bank Election : जिल्‍हा बँकेच्या मैदानात १७० उमेदवारांच्या उड्या

चार मंत्री, दोन खासदार, चार आमदार, माजी मंत्र्यांसह दिग्‍गजांचे अर्ज : २१ ऑक्‍टोबरपर्यंत माघार

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला गुरुवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी चांगलीच रंगत आली. शेवटच्या दिवशी १६९ उमेदवारी अर्ज दाखल केल्‍याने निवडणूक यंत्रणेचा घामटा निघाला. रिंगणात सुमारे १७० उमेदवारांचे २३६ उमेदवारी अर्ज दाखल झाले. यामध्ये चार मंत्री, दोन खासदार, चार आमदारांसह माजी खासदार व आमदारांचाही समावेश आहे. त्यामुळे बँकेच्या २१ जागांसाठी होणारी निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.

बँकेच्या निवडणुकीसाठी मागील ४ दिवसांपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सुरुवातीच्या दिवसांपासूनच इच्छुकांची मोठी गर्दी झाली होती. मात्र, अखेरच्या दिवशी विविध मतदारसंघांतून मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. तालुका सोसायटी मतदारसंघांसह खरेदी-विक्री संघ, कृषी प्रक्रिया, नागरी बँका व पतसंस्था, गृहनिर्माण व दूध, औद्योगिक-विणकर-मजूर तसेच राखीव मतदारसंघांमध्येही अनेक दिग्गजांनी शड्डू ठोकला आहे.

सातारा तालुका सोसायटी मतदारसंघात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह सर्जेराव सावंत व काँग्रेसचे बाबासाहेब कदम मैदानात आहेत. वाई सोसायटीत ना. मकरंद पाटील, खा. नितीन पाटील आणि सत्यजित वीर यांनी अर्ज दाखल केले आहेत. विरोधात भाजपने दीपक ननावरे यांना उमेदवारी दिली आहे. फलटण तालुका सोसायटीत आ. रामराजे ना. निंबाळकर, संजीवराजे ना. निंबाळकर, तुकाराम शिंदे आणि शिवरूपराजे खर्डेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

कराड तालुका सोसायटी मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उदयसिंह पाटील, भाजपचे रामकृष्ण वेताळ यांच्यासह जगदीश जगताप आणि धनंजय पाटील यांनी अर्ज दाखल केले आहेत. जावली तालुका सोसायटीत भाजपचे ज्ञानदेव रांजणे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे आणि विठ्ठल गोळे यांनी अर्ज दाखल केल्याने या मतदारसंघातील लढतीकडे लक्ष लागले आहे. माण तालुका सोसायटी मतदारसंघात मंत्री जयकुमार गोरे, शिवसेनेचे शेखर गोरे आणि राष्ट्रवादीचे मनोजकुमार पोळ रिंगणात आहेत. गोरे बंधूंच्या वेगवेगळ्या राजकीय भूमिकांमुळे या मतदारसंघातील लढत महत्त्वाची ठरणार आहे.

पाटण तालुका सोसायटी मतदारसंघात मंत्री शंभूराज देसाई, सत्यजित पाटणकर, याज्ञसेन पाटणकर, अशोकराव पाटील आणि शशिकांत निकम यांनी अर्ज दाखल केले आहेत. कोरेगाव सोसायटी मतदारसंघामध्‍ये सुनील माने, सुनील खत्री, घनश्‍याम शिंदे यांचे अर्ज आहेत. खंडाळा सोसायटीतून राजेंद्र नेवसे, शामराव गाढवे, नितीन भरगुडे-पाटील, संतोष साळुंखे, आनंदराव शेळके-पाटील, संजीव गाढवे, अजय भोसले यांच्‍यासह इच्‍छुकांचे अर्ज असून, राष्‍ट्रवादी आणि भाजपचे नेते इच्‍छुकांची मनधरणी कशी करतात, हे पाहण्‍याजोगे आहे.

महाबळेश्‍वरात रूपाली राजपुरे (राष्‍ट्रवादी), राजेंद्र राजपुरे (राष्‍ट्रवादी), संजय मोरे (शिवसेना) यांचे अर्ज आहेत. तर खटावमध्‍ये इंदिरा घार्गे, प्रभाकर घार्गे (राष्‍ट्रवादी), धनंजय चव्हाण, नंदकुमार मोरे, सुनीता कदम (भाजप) यांचे उमेदवारी अर्ज आहेत. या ठिकाणीही उमेदवारांची मनधरणी करताना नेत्‍यांना कसरत करावी लागणार आहेत. अकरा सोसायटी मतदारसंघांबरोबरच राखीव मतदार संघांमध्‍येही शेकडो अर्ज दाखल झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT