जिल्हा बँकेचे 10 दिग्गज संचालक पडणार मैदानाबाहेर 
सातारा

Satara News : जिल्हा बँकेचे 10 दिग्गज संचालक पडणार मैदानाबाहेर

बँकिंग कायद्याचा कचाटा : 10 वर्षांपेक्षा जास्त कार्यकाल ठरणार अडचणीचा

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सहकार विभागाच्यावतीने बँकिंग कायदा (सुधारणा) अधिनियम 2025 ची अंमलबजावणी सुरु केली आहे. या कायद्यामुळे 10 वर्षे व त्यापेक्षा जास्त कार्यकाल पूर्ण झालेले सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे दिग्गज संचालक आगामी काळामध्ये मैदानाबाहेर पडणार आहेत. विद्यमान 10 संचालकांना या कायद्याचा फटका बसणार आहे. यामध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनाही धक्का बसणार आहे.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष खा. नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, ज्येष्ठ संचालक आ. रामराजे ना. निंबाळकर, ना. शिवेंद्रराजे भोसले, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, माजी आमदार प्रभाकर घार्गे, दत्तानाना ढमाळ, राजेंद्र राजपुरे, प्रदीप विधाते, कांचन साळुंखे या विद्यमान संचालकांचा सलग दहा वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे आगामी निवडणूक या 10 संचालकांना लढवता येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. यापैकी खा. नितीन पाटील, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, रामराजे ना. निंबाळकर, ना. शिवेंद्रराजे भोसले, प्रभाकर घार्गे, अनिल देसाई, दत्तानाना ढमाळ, राजेंद्र राजपुरे यांची प्रत्येकी तिसरी टर्म सुरु आहे. बँकिंग कायदा (सुधारणा) अधिनियम, 2025 मध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ज्या संचालकांनी 10 वर्षांपेक्षा जास्त कालावधी संचालक म्हणून कार्यकाळ पूर्ण केला असेल असे संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुढील निवडणुकीसाठी अपात्र ठरणार आहेत. 10 वर्षे व त्यापेक्षा जास्त कार्यकाळ पूर्ण केलेले बहुतांश संचालक आहेत.

जिल्हा बँकेत 21 संचालक विविध मतदारसंघांमधून निवडून आले आहेत. त्यामध्ये 10 दिग्गज मंडळींना जिल्हा बँकेत संचालक म्हणून पुन्हा एंट्री मिळणार नाही. मात्र, या संचालकांच्या घरातील व्यक्तींना संधी दिली जावू शकते. विकास सेवा सोसायटी, बाजार समिती, गृहनिर्माण सहकारी संस्था, दूध उत्पादक संस्था, पशु पैदास, वराह पालन, कुकुटपालन, शेळी-मेंढी पालन संस्था, खरेदी विक्री संघ, प्रक्रिया उद्योग, मजूर फेडरेशन, बँका-पतसंस्था, इतर मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, महिला प्रतिनिधी अशा विविध मतदारसंघांमध्ये या नेतेमंडळींचा प्रभाव आहे. येत्या डिसेंबर महिन्यामध्ये जिल्हा बँकेचे धूमशान रंगणार असून तेव्हा ही मंडळी कुणाला संधी देतात, याबाबत उत्सुकता लागलेली आहे. विविध संस्थांमध्ये सत्तेची पक्की मांडदेखील या मंडळींची आहे. या परिस्थतीमध्ये ही मंडळी आपल्या कुटुंबातील एका व्यक्तीला जिल्हा बँकेवर संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील, हे निश्चित मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT