Satara District Bank Pudhari Photo
सातारा

Satara District Bank : जिल्‍हा बँकेच्‍या अध्‍यक्षपदावरून महायुतीत रणकंदन

उदयसिंह पाटील, संजीवराजे, अतुलबाबा व रणजितसिंहांच्‍या नावांवरून खलबते

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्‍हा बँकेच्‍या अध्‍यक्षपदावरून महायुतीत रणकंदन सुरू आहे. भाजपला ९, राष्‍ट्रवादी काँग्रेसला ८, तर शिवसेनेला ४ जागा मिळाल्‍याने प्रत्‍येक पक्ष सोयीचा अध्‍यक्ष व्‍हावा, यासाठी अंतर्गत लॉबिंग करताना दिसत आहे. खासगी बैठका, गुप्‍त चर्चांना ऊत आला असून चेअरमन, व्‍हा. चेअरमन पदांवरून महायुतीत घमासान होणार असल्‍याची चिन्‍हे आहेत. सद्यस्‍थितीत अध्‍यक्षपदासाठी माजी सहकारमंत्री स्‍व. विलासराव पाटील-उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील-उंडाळकर, जिल्‍हा परिषदेचे माजी अध्‍यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर, भाजपचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. डॉ. अतुलबाबा भोसले, माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर यांच्‍या नावांवरून खलबते सुरू झाली आहेत.

बँकेत महायुतीचीच सत्ता आली, असली तरी पहिल्‍यांदाच बँकेत काँग्रेस राष्‍ट्रवादी विचाराच्‍या विरोधी असलेल्‍या भाजपचे वर्चस्‍व निर्माण झाले आहे. भाजपने स्‍वबळावर बँकेत येण्‍याचे मनसुबे रचले होते; मात्र जिल्‍हा परिषदेच्‍या सत्तानाट्यावेळी जे काही घडले त्‍यावरून विधानसभेत विरोधी पक्षांनी महायुतीतील अंतर्गत मतभेद एन्‍जॉय केले. त्‍यामुळे मुख्‍यमंत्र्यांनी काहीही झाले, तरी बँकेत महायुतीतल्‍या जिल्‍ह्यातील नेत्‍यांनी एकत्र बसून सत्ता आणावी, असे आदेश दिले होते, तरीही सोसायटी मतदारसंघांमध्‍ये व उर्वरित काही मतदारसंघात घमासान झालेच. एकमेकांच्‍या उमेदवाराला पाडापाडीचे प्रयत्‍नही उघडकीस आले. त्‍यावरून महायुतीतील मंत्र्यांमध्‍ये व नेत्‍यांमध्‍ये मतभेदाची दरी रुंदावली. बँकेवर वर्चस्‍व असावे यावरून एकमेकांना शह-काटशह देण्‍याच्‍या प्रकारामुळे महायुतीत बेबनाव वाढला आहे.

भाजपने सर्वाधिक ९ जागा जिंकल्‍याने भाजपच्‍या काही नेत्‍यांना चेअरमन भाजपचा असावा, असे वाटत आहे. मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याकडे त्‍यांनी तसा विचारही पोहोचवला आहे. राष्‍ट्रवादी काँग्रेस व शिवसेना एकत्र आल्‍यास चेअरमन राष्‍ट्रवादी काँग्रेसचा व व्‍हा. चेअरमन शिवसेनेचा असे वाटप करून सत्तेवर येण्‍याचे मनसुबे रचले जात आहेत. भाजपमध्‍येही प्रबळ नेत्‍यांमध्‍ये मतभेदांची दरी वाढत आहे.

मात्र, राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या बँकेतील सत्तेला भाजपने जागा वाढवत हादरा दिला. त्‍याच जोरावर भाजपचे नेते चेअरमनपदासाठी आग्रही असल्‍याचे सांगितले जात आहे. विविध नावांवरून खलबते सुरू असली तरी या सर्व प्रक्रियेत खा. श्री. छ. उदयनराजे यांची भूमिका निर्णायक व महत्त्वाची ठरेल. त्‍यातच बँकेबाहेर असलेले मंत्री शिवेंद्रराजे, तर बँकेत एन्‍ट्री केलेले ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे कुणाच्‍या बाजूने कौल देतात, हे औत्‍सुक्‍याचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT