ना. शंभूराज देसाई यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांनी एकत्र येत जिल्हा बँकेच्या चेअरमनपदाची रणनीती ठरवली.  Pudhari
सातारा

Satara District Bank : ‘राष्ट्रवादी - सेना’ भाजपला दणका देणार?

सत्तावाटपाच्या नव्या फॉर्म्युल्यामुळे बँकेची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड रंगतदार

पुढारी वृत्तसेवा

सातारा : जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीचा बुधवारी धुरळा उडणार आहे. अध्यक्षपदाचा पहिला मान भाजपला मिळणार की राष्ट्रवादी काँग्रेसला, याभोवती जिल्ह्यातील राजकारण फिरू लागले आहे. महायुतीमधील घटक पक्षांच्या नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका, बंद दाराआड झालेल्या राजकीय चर्चा आणि सत्तावाटपाच्या नव्या फॉर्म्युल्यामुळे बँकेची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड रंगतदार बनली आहे.

मंगळवारी रात्री उशिरा भाजप वगळून राष्ट्रवादी व शिवसेनेच्‍या मंत्री आणि नेत्‍यांनी संचालकांसह एकत्र येत रणनीती ठरवली. भाजपने ऐकले नाही तर राष्ट्रवादी - सेना एकत्र येऊन भाजपला दणका देण्याच्‍या तयारीत असल्‍याचे चित्र निर्माण झाले आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत भाजपने ९, राष्ट्रवादी काँग्रेसने ८, तर शिवसेनेने ४ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे महायुतीकडे एकूण २१ पैकी २१ संचालक असले तरी अध्यक्षपदाच्या पहिल्या संधीवरून घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.

अध्यक्ष निवडीसाठी ११ संचालकांचा कोरम आवश्यक असल्याने उपस्थिती आणि मतदानाच्या गणिताला महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून निवडणूक प्रक्रियेत कोरम पूर्ण होऊ न देण्याची रणनीती आखली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. विशेषतः गोकुळ दूध संघाच्या राजकारणाची किनार या निवडीला असल्याने भाजप कोणती भूमिका घेणार, याबाबत उत्सुकता आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्रित चर्चा करून संभाव्य राजकीय डावपेचांना उत्तर देण्याची तयारी केली आहे.

मंगळवारी रात्री उशिरा मकरंद पाटील यांच्‍या नव्‍या निवासस्‍थानी पालकमंत्री शंभूराज देसाई, आ. रामराजे नाईक निंबाळकर, खा. नितीन पाटील, संजीवराजे नाईक निंबाळकर यांची बैठक झाली. यावेळी १२ संचालक उपस्‍थित असल्‍याचे समजते. विशेष म्‍हणजे या बैठकीला भाजपचा कोणताही नेता उपस्‍थित नव्‍हता. भाजपला वगळून राष्ट्रवादी व शिवसेना चेअरमन, व्‍हाईस चेअरमन ठरवू शकतात असा संदेश या बैठकीतून दिला गेला आहे. त्‍याचवेळी भाजपची नाराजी नको म्‍हणून ऐनवेळी शिवेंद्रराजेंच्‍या गटाला व्‍हाईस चेअरमन पद देण्याबाबतही अंतर्गत चर्चा झाल्‍याचे समजते.

बँकेच्या निवडणुकीत महायुती एकत्र आणण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा निर्णय स्थानिक नेत्यांनी घ्यायचा की मुख्यमंत्र्यांच्या पातळीवरून अंतिम नाव निश्‍चित होणार, हा कळीचा प्रश्‍न बनला आहे. ना. शिवेंद्रराजे आणि ना. शंभूराज देसाई यांनी स्थानिक पातळीवरील नेत्यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा, अशी भूमिका मांडली आहे. तर ना. जयकुमार गोरे यांनी बँकेची निवडणूक मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महायुती म्हणून लढवली असल्याने अध्यक्ष निवडीचा अंतिम अधिकारही मुख्यमंत्र्यांचाच असल्याची भूमिका घेतली होती.

अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्यास उदयसिंह पाटील यांना संधी मिळू शकेल. अशा परिस्थितीत उपाध्यक्षपद चंद्रकांत जाधव, ज्ञानदेव रांजणे, काका धुमाळ यांना मिळू शकेल. भाजपने उपाध्यक्ष पद स्‍विकारले नाही तर संजीवराजे अथवा दीपक चव्‍हाण उपाध्यक्ष होऊ शकतील. अध्यक्षपद भाजपकडे आल्यास जिल्हाध्यक्ष अतुलबाबा भोसले यांच्या नावावर एकमत होवू शकते. अशा परिस्थितीत उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे जावून उपाध्यक्षपदी उदयसिंह पाटील उंडाळकर अथवा सुनील माने यांना संधी मिळू शकेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT