सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या हालचालींना आता वेग आला आहे. भाजपने बँक ताब्यात घेण्यासाठी निवडणूक प्रतिष्ठेची केल्याचे चित्र असतानाच सहकारातील राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून सर्वपक्षीय सर्वसमावेशक पॅनेल उभे करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर बँकेत झालेल्या बैठकीनंतर ज्येष्ठ संचालक आ. रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह प्रमुख संचालकांच्या स्वतंत्र खलबतांनी राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
जिल्हा बँकेची अंतिम मतदार यादी शुक्रवारी प्रसिद्ध झाली. त्यानिमित्त बँकेत झालेल्या बैठकीस ज्येष्ठ संचालक आ. रामराजे नाईक निंबाळकर, बँकेचे अध्यक्ष खा. नितीन पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक प्रभाकर घार्गे, राजेंद्र राजपुरे, रामभाऊ लेंभे, सुनील खत्री, कांचन साळुंखे आदी उपस्थित होते.
बैठकीनंतर बँकेच्या गेस्ट हाऊसमध्ये आ. रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासोबत काही ज्येष्ठ संचालकांची चर्चा झाली. माजी मंत्री बाळासाहेब पाटील बैठक संपताच निघून गेले. त्यानंतर खा. नितीन पाटील व उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी रामराजेंसोबत सुमारे तासभर चर्चा केली. येत्या दोन दिवसांत प्रमुख संचालक एकत्र बसून निवडणुकीची रणनीती निश्चित करणार असल्याची माहिती आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भूमिका या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे आगामी दोन-तीन दिवसांतील बैठका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. दरम्यान, विद्यमान संचालक शेखर गोरे यांनी यावेळीही जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आपण राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्वसमावेशक पॅनेलमध्ये कोणाला संधी मिळणार, कोण कोणाला 'ॲडजेस्ट' करणार आणि कोणाला बाहेरचा रस्ता दाखवला जाणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.