सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची राजकीय रंगत वाढत असतानाच अंतिम मतदारसंख्येने सत्तासंघर्षाचे गणित अधिक स्पष्ट केले आहे. यंदा २ हजार १९ मतदार बँकेच्या सत्तेचा कौल ठरवणार आहेत. जिल्हा बँकेतील २१ संचालक निवडीसाठी मतदार ठरवण्याची प्रक्रिया आता अंतीम झाली आहे. कोल्हापूर विभागीय सहनिबंधक डॉ. महेश कदम यांनी यादीवर आलेल्या हरकतींचा निपटारा करुन अंतीम मतदार यादी शुक्रवारी जाहीर केली.
यंदाच्या मतदार यादीत सर्वाधिक ९६३ मतदार प्राथमिक कृषी पतपुरवठा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या गटातील आहेत. एकूण मतदारसंख्येच्या तब्बल ४७.९ टक्के मतदार या गटात असल्याने जिल्हा बँकेच्या सत्तेची खरी चावी ग्रामीण सहकाराच्या हातात राहणार आहे. त्यामुळे या संस्थांवरील राजकीय पकड मजबूत करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांची मोर्चेबांधणी निर्णायक ठरणार आहे.
ग्रामीण सहकाराच्या ९६३ मतदारांमध्ये सातारा आणि कराडचे प्रत्येकी १४६ मतदार आहेत. म्हणजे या दोन तालुक्यांत मिळून तब्बल २९२ मतदार आहेत. त्याखालोखाल फलटणचे १३१, पाटणचे १०४, माणचे १०२, कोरेगाव व खटावचे प्रत्येकी ९०, खंडाळ्याचे ७५, वाईचे ५९, जावळीचे ४८ आणि महाबळेश्वरचे १२ मतदार आहेत.
नागरी पतसंस्था, ग्रामीण बिगरशेती व पगारदार पतसंस्थांच्या गटातील ३७९ मतदार महत्त्वाचे आहेत. एकूण मतदारसंख्येच्या सुमारे १८.८ टक्के मतदार या गटात आहेत. खरेदी विक्री संघात १०, कृषी उत्पादन प्रक्रियामध्ये २९, गृहनिर्माण, दूध उत्पादक व इतर संस्थांचे २९५ मतदार आहेत. औद्योगिक विणकर, मजूर संस्थांचे ३४३ मतदार आहेत. असे एकूण २०१९ मतदार अंतीम झाले आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक केवळ ग्रामीण विरुद्ध नागरी सहकार अशी मर्यादित राहणार नाही. प्रत्येक गटातील संस्थात्मक संपर्क, प्रतिनिधींची वैयक्तिक नाळ आणि पॅनेलनिहाय मतदानाची बांधणी यावर विजयाचे गणित ठरणार आहे.
गत निवडणुकीपेक्षा ५५ मतांची भर
२०२१ मध्ये जिल्हा बँकेच्या अंतिम मतदार यादीत १,९६४ मतदार होते. यंदा ही संख्या २,०१९ झाली असून ५५ मतदारांची वाढ झाली आहे.