सातारा

Satara Navratri Festival: जिल्ह्यात आजपासून आदिशक्तीचा जागर

‘उदे गं अंबे उदे’चा घुमणार गजर : देवींच्या मंदिरांवर आकर्षक रोषणाई

पुढारी वृत्तसेवा

सातारा : जिल्ह्यात आज रविवारपासून ‘आई उदे गं अंबे उदे’च्या जयघोषात आदिशक्तीचा उत्सव शारदीय नवरात्रौत्सवाला घटस्थापनेने सुरुवात होत आहे. यानिमित्ताने शहरासह जिल्ह्यातील देवींच्या मंदिरांना आकर्षक रंगरंगोटी केली आहे. तसेच मंदिरांत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तसेच मंदिरे रोषणाईने उजळून निघाली आहेत.

घटस्थापना व नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात भक्तिमय वातावरण आहे. प्रतापगड येथील भवानी माता, औंध येथील यमाई देवी, मांढरदेव येथील काळूबाई, आसले येथील भवानी माता, किन्हई येथील साखरगडनिवासिनी, कुसुंबी येथील काळेश्वरी, अजिंक्यतारा येथील मंगळाई, पार येथील श्रीराम वरदायिनी, घाटवण येथील घाटाई, धावडशी येथील वाघजाई, पाटखळ येथील वडजाई, भुईंज येथील महालक्ष्मी, देऊर येथील मुधाई, माणमधील कुळकजाई, शेंद्रे येथील भवानी माता, देवी चौकातील महाकाली मंदिर, पंचपाळी हौदावरील दुर्गामाता मंदिर, मर्ढे येथील काळेश्वरीसह विविध मंदिरांत जागरास प्रारंभ होत आहे. या काळात रोज सकाळी महाआरती, पूजा, अर्चा, महानैवेद्य, मंत्र पुष्पाजंली, कुंकुमार्चन सोहळा, भजन, कीर्तन, प्रवचन यासह विविध स्पर्धा होणार आहेत.

घटस्थापनेचा मुहूर्त व नवरंग...

घटस्थापनेसाठी रविवारी सकाळी ६.१९ मिनिटांपासून ते सकाळी १०.१२ वाजेपर्यंत. तर अभिजित मुहूर्त सकाळी ११ वाजून ४४ मिनिटांपासून १२ वाजून ३१ मिनिटांपर्यंत आहे. नवरात्रौत्सवामध्ये देवीची नऊ रूपांमध्ये पूजा केली जाते. त्यानुसार येणार्‍या नवरंगांमध्ये रविवारी ११ रोजी केशरी, भगवा, १२ रोजी पांढ­­­­रा, १३ रोजी लाल, १४ रोजी निळा, १५ रोजी पिवळा, १६ रोजी हिरवा, १७ रोजी राखाडी, १८ रोजी जांभळा, १९ रोजी मोरपंखी हिरवा असे रंग आहेत.

बाजारपेठेत झुंबड

घटस्थापनेसाठी नागरिकांसह महिलांची तयारी उत्साहात सुरू आहे. शनिवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे सातारा शहर व परिसरातील बाजारपेठेत नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. पूजा साहित्य, देवीसाठी महावस्त्र, नारळ, हार, फुले, मातीचा घट, माती, विविध प्रकारचे धान्य, नाडापुडी, खाऊची पाने, उदबत्ती, कापूर, धूप, रांगोळ्या, सजावटीचे साहित्य, खरेदीसाठी महिला वर्गाची झुंबड उडाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT