Digital Farming 
सातारा

Satara News : जिल्ह्यातील 12 गावात एआय अंतर्गत फळबाग लागवड

सातारा जिल्ह्यात राज्यातील पहिला प्रयोग : कृषि क्षेत्रात क्रांतीकारी पाऊल

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्ह्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत कृषि क्षेत्रात एक क्रांतीकारी पाऊल उचलले आहे. सातारा जिल्ह्यातील 12 गावांमध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेंतर्गत फळबाग लागवड करण्यात आली आहे. राज्यातील पहिला प्रयोग सातारा जिल्ह्यात कृषि विभागामार्फत राबवला जात आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील शेती आता आणखी स्मार्ट झाली आहे. आधुनिक एआय यंत्रणेद्वारे होणाऱ्या तंत्रामुळे पाण्याचा कार्यक्षम वापर होवून उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे.

सातारा जिल्ह्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत शेती क्षेत्रात एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. जिल्हा नियोजन समिती आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नाविण्यपूर्ण आधुनिक फळबाग उत्पादन तंत्रज्ञानावर आधारित फळबाग विकास प्रकल्प अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) युनिट्सच्या स्थापनेला जिल्ह्यात यशस्वी सुरुवात झाली आहे. रिअल-टाईम विश्लेषणामुळे शेतकऱ्यांना दिशा मिळण्यास मदत झाली आहे. या प्रायोगिक प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना आता आपल्या फळपिकांची स्थिती, हवामानातील बदल, मातीतील ओलावा तसेच कीड व रोगांचे व्यवस्थापन यांबाबत रिअल-टाईम (तात्काळ) माहिती मिळणार आहे. आधुनिक एआय यंत्रणेद्वारे होणाऱ्या या विश्लेषणामुळे पाण्याचा कार्यक्षम वापर होऊन उत्पादन वाढणार आहे, शिवाय औषधे आणि खतांच्या खर्चातही मोठी बचत होणार आहे.

हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जिल्ह्यातील 5 तालुक्यांतील 12 गावांमधील सुमारे 725 हेक्टर क्षेत्रावर राबवला जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने कोरडवाहू क्षेत्रातील सलग फळबागांचा समावेश आहे. प्रकल्पात सहभागी होणाऱ्या इच्छुक शेतकऱ्यांना केवळ तंत्रज्ञानच नव्हे, तर फळपीक उत्पादन वाढ, कीड-रोग नियंत्रण, एक्सपोर्ट गुणवत्ता आणि कृषी एआय बाबत विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच कीड व्यवस्थापनासाठी ट्रॅप्स-ल्युर्स आणि इतर तांत्रिक सहाय्य देखील पुरवले जाणार आहे. या प्रकल्पामुळे सातारा जिल्ह्याची शेती आता स्मार्ट आणि प्रिसिजन शेतीकडे वळली असून, डिजिटल कृषी व्यवस्थेच्या दिशेने पडलेले हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. एआय आधारित यंत्रणेमुळे पिकांचे सतत निरीक्षण करणे आणि अचूक निर्णय घेणे शक्य होईल. विशेषतः उच्च मूल्य असलेल्या फळपिकांच्या उत्पादकतेत वाढ करण्यासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी सांगितले.

कृषी क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा वापर हा भविष्यातील शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक आणि शाश्वत शेती पद्धती उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, या प्रकल्पाचे निष्कर्ष भविष्यात संपूर्ण जिल्ह्यासाठी मार्गदर्शक ठरतील.
-संतोष पाटील, जिल्हाधिकारी, सातारा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT