वाई/वेलंग : वाई तालुक्यातील पाण्याचा मुख्य स्त्रोत म्हणून धोम धरणाकडे पाहिले जाते. मात्र, या धरणाच्या सुरक्षेकडे पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्याने धोम धरण म्हणजे ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी अवस्था झाली आहे. संपूर्ण धरणाची अवघ्या एका गार्डवर सुरक्षेची जबाबदारी आहे. तसेच येथे पथदिव्यांचीही वाट लागली असून झाडेझुडपे वाढली आहे. देखभालीसाठी एकही कर्मचारी नसल्याने धरणाची सुरक्षा रामभरोसे आहे.
वाईच्या दुर्गम भाग म्हणून ओळख असणार्या पश्चिम भागात 50 वर्षापूर्वी धोम धरणाची उभारणी करण्यात आली. या धरणातील पाण्यामुळे पाच तालुके सुजलाम सुफलाम झाले आहे. मात्र, सध्याच्या घडीला या धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. सध्याच्या घडीला धोम धरणावर परिसरातील लोक धुणी- भांडी करण्यासाठी धरणाच्या भिंतीवर येतात, धरणाचा धोबीघाट झाला आहे. धरणाचा परिसर बिनधास्त शुटींगसाठी दिला जात आहे.
कित्येक मुलं पोहोण्यासाठी पाण्यात उतरताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. धरणाच्या भिंतीवर नेहमीच पर्यटक व स्थानिकांचा वावर असतो. मात्र, त्यांना रोखणारे कोणीच नाही. धरणाच्या भिंतीवरील स्ट्रीट लाईट चालू नाहीत लाईट बॉक्स उघडे पडलेले आहेत.धरण परिसरात अनधिकृत बांधकामाचे पेव फुटले आहे. धरणावरील संरक्षक भिंती कधीही ढासळू शकतात, धरणाच्या भिंतीवर असणार्या कंट्रोल रूमची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे.
पोलीस कर्मचारी संख्या कमी असल्याचे कारण पुढे करत या ठिकाणी कर्मचारी देण्यास पोलीस प्रशासन चालढकल करत आहे. एका सुरक्षा रक्षकावर पाटबंधारे खात्याने किती विश्वास ठेवावा, अशीही चर्चा आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी स्वतः लक्ष घालून धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लावावा, अशी या भागातील ग्रामस्थांची मागणी आहे.