सणबूर : एकीकडे विज्ञानाने आकाशाला गवसणी घातली, माणूस चंद्रावर पोहोचला, जग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात प्रवेश करत आहे; मात्र दुसरीकडे ढेबेवाडी विभागातील काही गावांमध्ये आजही लिंबू, नारळ, अंडी, काळ्या बाहुल्या, खिळे आणि करणी-बाधेच्या नावाने अंधश्रद्धेचा बाजार सुरू असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. आधुनिकतेचा मुखवटा धारण केलेल्या समाजाच्या मानसिकतेत मात्र अंधश्रद्धेची मुळे किती खोलवर रुजली आहेत, हे अशा प्रकारांवरून स्पष्ट होत आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे या अज्ञानाचा फायदा घेऊन काही भोंदू प्रवृत्तींनी अक्षरशः धंदाच उभा केला आहे.
घरात आर्थिक अडचण आली, मुला-मुलींचे लग्न जमत नाही, शेतीत नुकसान झाले, घरात आजारपण सुरू झाले किंवा भावकीत वाद निर्माण झाला की त्यामागे कोणीतरी करणी केली आहे, अशी भीती निर्माण केली जाते. समस्येचे वास्तविक कारण शोधण्याऐवजी भूतबाधा, करणी, बाधा, दृष्ट आणि काळी जादू अशा काल्पनिक भीतींच्या जाळ्यात माणसाला अडकवले जाते. एकदा का व्यक्ती या भीतीच्या आहारी गेली की तिच्या विवेकबुद्धीवर पडदा पडतो आणि याच क्षणाची वाट पाहणार्या भोंदूबाबांची दुकानदारी सुरू होते.
गावाच्या वेशीवर, रस्त्याच्या तिकाटण्यावर, चौकात आणि झाडांखाली लिंबू, नारळ, अंडी, भात, हळद-कुंकू तसेच विविध वस्तू ठेवण्याचे प्रकार अद्याप थांबलेले नाहीत. काही ठिकाणी झाडांच्या खोडात खिळे ठोकून काळ्या बाहुल्या आणि इतर वस्तू अडकवल्या जातात. ढेबेवाडी विभागातील ही अंधश्रद्धेची कीड मुळासकट उपटून काढण्यासाठी आता केवळ भाषणे आणि अधूनमधून होणारे प्रबोधन पुरेसे नाही. गावोगावी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी मोहीम उभी राहिली पाहिजे.
अंधश्रध्दा रोखण्यासाठी शालेय शिक्षणापासूनच वैज्ञानिक दृष्टिकोनाची रुजवण होणे आवश्यक आहे. समाजाने कोणत्याही गोष्टीवर आंधळा विश्वास ठेवण्याऐवजी प्रश्न विचारले पाहिजेत. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केवळ कायदा पुरेसा नाही, तर समाजाची मानसिकता बदलणेही तितकेच महत्त्वाचे आहे.- प्रा. डॉ. सुधीर कुंभार, विज्ञान प्रसारक