सातारा

Satara Theft: ढेबेवाडीत केबल चोरांची टोळी गजाआड

चारचाकीसह तीन लाखांचा मुद्देमाल जप्त; बाचोली प्रकरणाचा पोलिसांकडून पर्दाफाश

पुढारी वृत्तसेवा

सणबूर : ढेबेवाडी व परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीपंपांच्या केबल वायर, लोखंडी सळ्या तसेच बांधकाम साहित्यावर डल्ला मारणाऱ्या संशयितांच्या टोळीचा ढेबेवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला. बाचोली (ता. पाटण) येथील चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना संशयितांचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेली चारचाकी, कॉपर केबल वायर, सळ्या आणि सेट्रिंगच्या लोखंडी प्लेटा असा एकूण तीन लाख एक हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सुनील कदम (कदम आवड ) मंद्रुळकोळे), क्षितिज उर्फ ओंकार साठे (सणबूर), शुभम गुरव (बाचोली), ओंकार निकम (बामणोली), निखिल थोरात (भोसगाव) आणि पवन गुरव येलूर ता. वाळवा) अशी संशयितांची नावे आहेत. बाचोली येथे बांधकाम साहित्य चोरीस गेल्याची तक्रार ढेबेवाडी पोलिस ठाण्यात दाखल झाली होती.

या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी संशयितांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले. माहितीच्या आधारे संशयितांची चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी कारवाईत ३२ हजार ४०० रुपये किमतीच्या ५४० किलो लोखंडी सळ्या, १४ हजार रुपये किमतीच्या सेट्रिंगच्या १४ लोखंडी प्लेटा, दोन लाख रुपये किमतीची चारचाकी आणि ५५ हजार रुपये किमतीची ५०० मीटर कॉपर केबल वायर जप्त करण्यात आली.

शेतीपंपांच्या केबल वायर चोरीला गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. वारंवार होणाऱ्या अशा चोरीच्या घटनांमुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली होती. पोलिसांच्या कारवाईमुळे चोरीच्या घटनांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. संशयितांनी परिसरातील अन्य ठिकाणीही अशाच प्रकारच्या चोऱ्या केल्या आहेत का ? याचा तपास सुरू आहे.

चोरी प्रकरणात आणखी काही संशयितांचा सहभाग असण्याच शक्यता वर्तविण्यात येत असून ढेबेवाडी पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. सहायक पोलिस निरीक्षक डॉ. प्रवीण दाईगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक इंद्रजित चव्हाण, प्रशांत चव्हाण, प्रशांत माने, सौरभ कांबळे, माणिक पाटील व संकेत पाटील यांनी तपास केला. पुढील तपास पोलिस हवालदार धीरजकुमार मुळे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT