सातारा : सातारा पालिकेचा सन 2026-2027 या आर्थिक वर्षाचा 597 कोटी 50 लाखांचा अर्थसंकल्प 3 लाख 38 हजार 347 रुपयांच्या शिल्लकीसह सादर करण्यात आला. उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर यांनी मांडलेल्या या अर्थसंकल्पात शहरासह हद्दवाढ भागासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. साताऱ्याच्या सर्वांगीण विकासासाठी हा अर्थसंकल्प बिग बजेट ठरणार आहे. दरम्यान, साताऱ्यात विविध विकासकामे प्रस्तावित असून, शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा 25 फूट उंच पुतळा बसवण्यात येणार आहे. सातारा पालिकेची विशेष सभा नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर म्हणाले, सातारा पालिकेचे 2025-2026 चे सुधारित अंदाजपत्रक 480 कोटी 10 लाखांचे आहे. हद्दवाढ झाल्यामुळे साताऱ्याचा झालेला अडीचपट विस्ताराचा विचार करून विविध विकासकामांसाठी या अर्थसंकल्पात बिग बजेट तरतूद केली आहे. साताऱ्याची व्याप्ती वाढल्यामुळे नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा देण्यासाठी होणारा खर्च विचारात घेतल्यास करांच्या वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने जमा झालेल्या निधीतून नागरिकांना आरोग्य, पाणी, विद्युत आदी मूलभूत सुविधा देण्याचा मानस आहे.
सातारा पालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी नियमित वेतना व्यतिरिक्त कालबद्ध फरक, पेन्शन दुरुस्ती फरक, वेतनवाढ फरक तसेच कर्मचाऱ्यांना वैद्यकीय विमा यासाठी या अंदाजपत्रात पुरेशी तरतूद करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोग, सेवानिवृत्तीधारक पेन्शन फरक पूर्णपणे अदा करण्यात आला आहे. सातारा पालिकेस माझी वसुंधरा अभियानात राज्यात प्रथम क्रमांक मिळाला असून 6 कोटीचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. पथदिव्यांचे स्वयंचलन करण्याचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे पथदिव्यांच्या विद्युत बिलावरील खर्च कमी होणार आहे. सौर ऊर्जा प्रकल्प उभारुन त्यास मान्यता देण्यात येणार आहे. शहरातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विविध भागात नमो उद्यान व उर्वरित उद्याने विकसित करण्यात येणार आहेत.
सातारा पालिकेचा वाहतूक विभाग सक्षम करण्यासाठी विविध प्रकारच्या वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. 2026-2027 या अर्थसंकल्पात पिण्याच्या पाण्यासाठी छोटे टँकर खरेदी करण्यात येणार आहेत. तसेच नवी वाहने व मशिनरी खरेदीसाठी 2 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महिला व बालकल्याण, दिव्यांग कल्याणकारी योजना व मागासवर्गीय कल्याणकारी योजनेत प्रत्येकी 58 लाखांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. शहरातील 512 महिला व पुरुष व्यवसायिकांना 6 कोटी 62 लाख कर्जपुरवठा व 690 बचत गटांना कर्ज वाटप करण्यात आले आहे.
अनाथ व बेघर 127 लोकांसाठी निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. 512 लाभार्थ्यांना रोजगार देण्यात आला आहे. हद्दवाढ भागातील 41.20 कि.मी. लांबीचे रस्ते, 17 कि.मी. लांबीचे गटर, 704 विद्युत खांब तसेच दिवाबत्तीची सोय करण्यात आली. हद्दवाढ भागात चार उद्याने विकसित करण्यात आली. या भागातील उर्वरित विकासकामेही लवकरच मार्गी लागणार आहेत. गोडोली, विलासपूर, खेड व सदरबझार या भागासाठी कास धरण ते सातारा शहर पाईपलाईन काम सुरु आहे. शाहूपुरी व दरे खर्द या भागातील नागरिकांसाठी कण्हेर धरणातून पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. नवीन शहर विकास आराखडा मंजूर झाल्यावर आरक्षित जागा विकसित केल्या जातील. खुल्या जागांचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे.
गुरुवार परज शॉपिंग सेंटर व पार्किंग विकसित करणे, जिल्हा परिषद चौक ते करिआप्पा चौक रस्ते काँक्रीटिकरण, राजवाडा येथे पार्किंग विकसित करण्याचा मानस आहे. शहरातील कचऱ्यावर खत निर्मिती केली जात आहे. गोडोली तलाव येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा 25 फुटी पुतळा व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करणे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसराचे सुशोभिकरण करणे, लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे स्मारक उभे करणे ही कामे लवकरच पूर्ण होणार आहेत. महादरे तलाव संरक्षण व सुशोभिकरण, शाहूपुरी व्यापारी केंद्र व स्टेडियम उभारणी करणे आदि कामे करण्यासाठी राज्य शासन व सातारा पालिका निधी उभारणार आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने सातारा शहर सीसीटीव्ही युक्त करण्याचा मानस आहे.
हद्दवाढ झाल्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे. त्यामुळे कामात त्रुटी राहणे किंवा काही प्रमाणात दिरंगाई होण्याची शक्यता आहे. नागरिकांना पर्यावरण, पाणी आणि निरोगी आरोग्य लाभावे हेच सातारा पालिकेचे उद्दिष्ट आहे. विकासकामांसाठी उभाराव्या लागणाऱ्या निधीसाठी नागरिकांनी कर वेळेत भरून सातारा पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन ॲड. डी. जी. बनकर यांनी केले. ॲड. बनकर हे बजेट सादर करत असताना सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्यासह सुनील काळेकर, अस्लम तडसरकर, मनीषा साळुंखे, सुषमा राजेभोसले या पदाधिकाऱ्यांनी प्रेक्षागॅलरीतून घोषणाबाजी करत अंदाजपत्रकासंबंधी दिलेले निवेदन वाचून दाखवावे, अशी मागणी केली. त्यातच बरेच प्रकल्प अपूर्ण आहेत.
पूर्ण झालेले प्रकल्प हे प्रशासक असताना अभिजीत बापट यांच्या कालावधीतील आहेत. त्यामुळे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी फुकटचे श्रेय घेऊ नये भुयारी गटर योजना, सौर ऊर्जा प्रकल्प, हद्दवाढ भागातील कामे अपूर्ण आहेत. छत्रपती संभाजी महाराज पुतळा व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा ही कामे तत्कालीन मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी केली असल्याचे सांगेत ॲड. बनकर यांच्यावर टीका केली. हा गोंधळ तब्बल दोन ते अडीच तास सुरुच राहिल्याने गदारोळ निर्माण झाला.
यावेळी गटनेते अविनाश कदम म्हणाले, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सातारा पालिकेने सुमारे 440 कोटींहून अधिक निधी उपलब्ध करून शहराचा विकास केला आहे. राजवाडा येथे बहुमजली पार्किंग करण्यात येणार असून त्यामध्ये हॉकर्ससाठी जागा उपलब्ध केली जाणार आहे. राजकीय पक्षांकडून जाणीवपूर्वक अडथळे आणले जात आहेत. त्यांना अर्थसंकल्पावर आक्षेप असेल तर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, अशा शब्दांत त्यांनी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सुनावले.
बांधकाम सभापती बाळू खंदारे व फिराज पठाण यांनी अर्थसंकल्पात विकासकामांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. नगरसेवकांना प्रभागातील नागरिकांची किरकोळ कामे करता यावीत यासाठी 20 लाखाची तरतूद करावी. कर्मचाऱ्यांच्या कामकाजाच्या वेळा निश्चित कराव्यात, अशी सूचना केली. नगरसेविका मुक्ता लेवे यांनी स्थायी समितीच्या शिफारशीशिवाय सभागृहात सादर केलेले बजेट बेकायदेशीर आहे. नगरपालिका निधीतून रस्त्यासाठी निधीची तरतूद केलेली नाही. आस्थापना खर्चाचा कुठेही उल्लेख केलेला नसल्याचे निदर्शनास आणून दिले.
राजू गोरे यांनी भुयारी गटर योजनेसाठी तरतूद करावी. मुदत संपलेले गाळे कायदेशीर प्रक्रिया राबवून ताब्यात घ्यावेत, अशी मागणी केली.यावेळी नगरसेविका सिद्धी पवार, सुशांत महाजन, निशांत पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.