सातारा : भुईंज, ता. वाई येथील डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती राजूभैय्या भोसले यांनी आरोग्य विभागाला प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या पथकांने विविध ठिकाणी भेटी देवून पाहणी केली.
भूईंज पंचक्रोशीत डेंग्यूची साथ या मथळ्याखाली दैनिक ‘पुढारी’ने वृत्त प्रसिध्द करताच जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. आरोग्य विभागाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अविनाश पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनय भोईटे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल गायकवाड यांनी भुईंज परिसरातील भुईंज, देगाव व बोपर्डी येथे प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान परिसरात सद्यस्थितीत तापाचे सक्रिय रुग्ण आढळून आले नाहीत. गत ४ महिन्यांत प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत डेंग्यू तपासणीसाठी २६ संशयित रुग्णांचे रक्त नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, आरडीकेद्वारे ५० रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासण्यांमध्ये एकही रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळलेला नाही.
दरम्यान, देगाव परिसरातील काही रुग्णांची खासगी प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या तपासणीत १२ रुग्णांचे परीक्षण पॉझिटिव्ह आढळले होते. संबंधित सर्व रुग्ण सध्या पूर्णपणे बरे झाले आहेत. या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्र भुईंजमार्फत देगाव ग्रामपंचायतीस कीटकजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. क्षेत्रीय पाहणीदरम्यान डासांच्या अळ्यांबाबतचा गृह निर्देशांक कमी असल्याचे निदर्शनास आले आहे.
आरोग्य विभागामार्फत गावागावात जनजागृती
डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा हिवताप कार्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्र, भुईंज यांच्या माध्यमातून घराघरात तापाच्या रुग्णांचे सर्वेक्षण, डासांची उत्पत्तीस्थळे शोधणे, पाणी साचणाऱ्या ठिकाणांचे निर्मूलन तसेच आवश्यकतेनुसार डासअळीनाशक औषधांचा वापर आदी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत नागरिकांमध्ये कीटकजन्य आजारांबाबत जनजागृतीही करण्यात येत आहे.
सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस 'कोरडा दिवस' पाळावा. ताप आल्यास नागरिकांनी विलंब न करता जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागामार्फत संबंधित परिसरात नियमित सर्वेक्षण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना सातत्याने सुरू ठेवण्यात येणार आहेत.-राजूभैय्या भोसले, उपाध्यक्ष जि.प. सातारा