सातारा

Satara ZP: झेडपीच्या सत्तेवर आज उमटणार मोहर

राष्ट्रवादी-शिवसेनेच्या अंतर्गत हालचालींना वेग : गोपनीय बैठकांचा धडाका

पुढारी वृत्तसेवा

सातारा : जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेच्या अनुषंगाने राष्ट्रवादी व शिवसेना या दोन्ही पक्षांनी गोपनीय हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत. गुरुवारी रात्री येथील एका हॉटेलवर जिल्हा परिषद व पंचायत समितीला निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांची बैठक झाली. तर शिवसेनेने शुक्रवारी दुपारी पक्षाच्या नूतन सदस्यांची बैठक साताऱ्यातच आयोजित केली आहे. जिल्हा परिषदेच्या सत्तेवर लवकरच राष्ट्रवादी आणि शिवसेना मोहर उमटवणार आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नुकतीच निवडणूक पार पडली. भाजपने या निवडणुकीत स्वबळ आजमावले, तर राष्ट्रवादीचे दोन्ही गट आणि शिवसेना यांनी एकत्र येत बहुतांश ठिकाणी निवडणूक लढवली. जिल्ह्याच्या जनतेने मात्र, संमिश्र कौल दिला आहे. भाजपचे 27, राष्ट्रवादी व स्वाभिमानीचे 21, तर शिवसेनेचे 15 सदस्य निवडून आले. काँग्रेस, अपक्ष असा प्रत्येकी 1 सदस्य निवडून आला असून, कुठल्याच पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने सत्तास्थापनेचे त्रांगडे झाले.

मात्र, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांनी ही निवडणूक एकत्रित लढली असल्याने नैसर्गिक न्यायाने हे दोन्ही पक्ष एकत्रित यावेत, जनभावना असल्याचे मत शिवसैनिक तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवरही दबाव वाढलेला आहे. या परिस्थितीमध्ये ना. मकरंद पाटील, ना. शंभूराज देसाई, खा. नितीन पाटील, आ. शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर यांनी निकालानंतर तत्काळ एकत्रित बैठक घेत सत्ता स्थापनेच्या अनुषंगाने प्राथमिक चर्चा केली. याच बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच विषय समित्यांच्या सभापतिपदांबाबतही सविस्तर चर्चा झाली.

आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेने पक्षांतर्गत बैठकीचा सपाटा सुरू केला आहे. दोन्ही पक्षांच्या नूतन जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सदस्यांशी पक्षाचे नेते चर्चा करत आहेत. राष्ट्रवादीतर्फे ना. मकरंद पाटील, खा. नितीनकाका पाटील, आ. शशिकांत शिंदे यांच्या वतीने गुरुवारी पक्षाच्या नूतन सदस्यांची बैठक घेण्यात आली.

तर शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी दुपारी विश्रामगृहावर बैठक आयोजित केली आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई, शिवसेनेचे संपर्क प्रमुख शरद कणसे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, रणजितसिंह भोसले, जयवंत शेलार यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांना निरोप पाठवण्यात आले आहेत. शिवसेनेच्यावतीने सविस्तर अहवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात येणार आहे. या बैठका पार पडल्यानंतर सत्ता स्थापनेच्या अनुषंगाने वाटाघाटी सुरु होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT