सातारा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत सातारा जिल्ह्यातील ८३० गावांतील ३ हजार ८३९ पात्र शेतकऱ्यांची तिसरी यादी शुक्रवार दि. ११ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केल्यानंतर त्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. यामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २५९२, तर राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांच्या १२४७ शेतकऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) संजयकुमार सुद्रिक यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ही योजना सुरू केली आहे. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेली आणि ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेली, तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली पीक कर्जे व पुनर्गठित, फेरपुनर्गठित कर्जांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येत आहे.
या योजनेसाठी सातारा जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांनी पोर्टलवर ५२,६२२ कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे. त्यापैकी पहिल्या व दुसऱ्या यादीत ३१,४४५ पात्र शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध करण्यात आली. आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या २६,५७२ लाभार्थ्यांच्या कर्जखात्यांवर १९६.६५ कोटी रुपये कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात आली आहे.
दरम्यान, पहिल्या व दुसऱ्या यादीतील अद्याप ३१८७ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी आहे. या शेतकऱ्यांनीही प्राधान्याने आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तिसऱ्या यादीतील लाभार्थ्यांची नावे गावनिहाय ग्रामपंचायत, विकास सेवा सहकारी संस्था, संबंधित बँक शाखा तसेच उपनिबंधक, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांमधील काही शेतकऱ्यांची ३१ मार्च २०२६ रोजीची थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असली तरी शासनाच्या 'हेअर कट' धोरणानुसार संबंधित कर्ज निरंक करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही, त्यांनी प्रथम फार्मर आयडी काढून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे. तसेच तिसऱ्या यादीतील ३,८३९ आणि मागील यादीतील आधार प्रमाणीकरण बाकी असलेल्या ३१८७ शेतकऱ्यांनी विलंब न करता प्रक्रिया पूर्ण करावी.- संजयकुमार सुद्रिक, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था