सातारा : साताऱ्यातील उपनगरांमध्ये आठवड्यातून एक दिवस शटडाऊन घेऊ नये, जलवाहिन्यांची लिकेजेस आठ दिवसांत काढावीत, पाणीपुरवठा बंद असेल त्यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने टँकरने पाणीपुरवठा करावा, शाहूनगर पाणी योजनेचे काम एप्रिलपर्यंत पूर्ण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार, असा इशारा नगरसेवकांनी दिला आहे. मुदतीत कामे पूर्ण करण्याची डेडलाईन प्राधिकरणाच्या अभियंत्यांना देण्यात आली आहे. दै. पुढारीच्या वृत्तानंतर प्राधिकरणाची तातडीची बैठक बुधवारी घेण्यात आली.
साताऱ्यातील शाहूनगर, गोडोली, विलासपूर, सदरबझार, दौलतनगर, करंजे, पिलेश्वरनगर, तामजाईनगर, शाहुपूरी या उपनगरांचा अनेक महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत आहे. नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. यावर मागील आठवड्यात बोलावलेल्या बैठकीत ठोस निर्णय न झाल्याने मंगळवारी बोलावलेली बैठक नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी अचानक रद्द केली. त्यामुळे नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. याबाबत दै. ‘पुढारी’ने वृत्त प्रसिध्द केले होते. त्याची दखल घेऊन नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंते यांची बुधवारी सायंकाळी सातारा पालिकेत बैठक झाली.
या बैठकीत कार्यकारी अभियंता अजित वाघमारे यांच्यासह अभियंत्यांनी पाणी वितरण व्यवस्थेचे तयार केलेले वेळापत्रक सादर केले. तसेच प्राधिकरणाच्या जलवाहिन्यांच्या लिकेजेसची कामे आठवड्यात पूर्ण केली जातील.
शाहूनगर वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम एप्रिलपर्यंत पूर्ण करून परिसरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याची समस्या दूर करण्यात येणार आहे. प्राधिकरणाकडून मंगळवारचा शटडाऊन न घेता सर्व दिवस पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा बंद असेल त्यावेळी प्राधिकरणाकडून टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. दरे पाणीपुरवठा योजनेतील त्रुटी दूर करून पालिका व प्राधिकरणाकडून या योजनेची पाहणी केल्यानंतर हस्तांतरण केले जाणार आहे. जलवाहिन्यांची कामे करण्यासाठी रस्ते खोदल्यास त्याच्या दुरूस्तीची पैसे प्राधिकरण नगरपालिकेकडे जमा करणार आहे. विस्कळीत पाणीपुरवठाची समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले. यावर नगरसेवकांनी आश्वासन न पाळल्यास आंदोलन करणार, असा इशारा नगरसेवकांनी दिला आहे. यावेळी मुख्याधिकारी अभिजीत बापट, नगरसेवक अविनाश कदम, फिरोज पठाण, राजू गोरे, प्राधिकरणाचे महादेव जंगम, विजय देशमुख, एल. एम. गडकरी आदि उपस्थित होते.