उंडाळे : तालुका पोलिस ठाण्याच्या उंडाळे दूरक्षेत्र परिसरातील बंगल्यात बुधवारी दुपारी घरफोडी झाली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून संशयितांनी आठ ते दहा तोळे सोने लंपास केले आहे. रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद तालुका पोलिस ठाण्यात करण्याची कार्यवाही सुरू असल्याने अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला नव्हता.
उंडाळे परिसरातील शेवाळेवाडी मार्गानजीक कराड तालुका पोलिस ठाण्याच्या उंडाळे दूरक्षेत्रानजीक अमोल शेवाळे व गणेश शेवाळे या दोघा बंधूचा बंगला आहे. या बंगल्यामध्ये बुधवारी दुपारी कोणीही नसल्याची संधी साधत अज्ञातांनी प्रवेश करत चोरी केली आहे. अमोल यांचे संगणकाचे दुकान असून लग्न कार्यानिमित्त आठ ते दहा दिवसांपूर्वी त्यांनी बँकेतील लॉकरमध्ये ठेवलेले सोने घरी आणले होते. यात आठ ते दहा तोळे सोन्याच्या दागिन्यांचा समावेश होता आणि चोरट्यांनी या दागिन्यांवर हात साफ केला आहे. याच बंगल्यात एका बाजूला शिक्षक असलेले अमोल यांचे बंधू गणेश वास्तव्यास आहेत. त्याच्या घरात सुद्धा दोन ते तीन तोळे सोन्याचे दागिने होते.
सुदैवाने चोरट्यांनी सर्व साहित्य विस्कटले असले तरी दागिने चोरट्यांच्या हाती लागलेले नाहीत. घटनेनंतर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत तालुका पोलिसांकडून घटनास्थळ परिसरात शोध मोहिम सुरू होती. मात्र चोरट्यांबाबत ठोस माहिती मिळू शकलेली नव्हती. घटनेची नोंद करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून सुरू असल्याने या घटनेचा अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला नव्हता.
चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण केले होते. मात्र श्वान शेवाळे कुटुंबीयांचे वास्तव्य असलेल्या परिसरातच घुटमळले असून चोरट्यांनी पळून जाण्यासाठी वाहनाचा वापर केल्याचे समोर आले आहे. याशिवाय घटनास्थळी ठसे तज्ज्ञांकडून आवश्यक ती कार्यवाही केली जात होती.