सातारा : एसटी पार्सल सेवेतून आलेली स्फोटके आणि ऑनलाईन मागवलेली नशेची इंजेक्शन्स... गेल्या आठ महिन्यांत सातार्यात उघडकीस आलेल्या या दोन गंभीर घटनांनी शहराच्या सुरक्षिततेवर भलेमोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. पार्सल आणि ऑनलाईन डिलिव्हरी सेवांवरील नियंत्रणाच्या अभावामुळे धोका थेट सातारकरांच्या घरात पोहोचत असून, या घटनांनी समाजमन हादरले आहे. भीतीने ग्रासले आहे. प्रशासनाने या घातक बाजारावर वेळीच नियंत्रण न मिळवल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी भीती व्यक्त होत आहे.
गत ऑक्टोबर महिन्यात सातारा शहरातील वर्दळीच्या माची पेठेत एका चिकन सेंटरमध्ये भीषण स्फोट झाला होता. या घटनेत एका व्यक्तीच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या होत्या. या घटनेने इतकी दहशत निर्माण झाली की, स्थानिक पोलिसांसह दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि गुप्तचर यंत्रणाही घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. पोलीस तपासात जे समोर आले ते अत्यंत धक्कादायक होते. मृत व्यक्ती फटाके बनवण्याचा व्यवसाय करत होता आणि त्यासाठी लागणारा दारुगोळा (गंधकसदृश स्फोटके) त्याने सोलापूर, बार्शी येथून चक्क एसटीच्या पार्सल सेवेद्वारे मागवला होता. याच स्फोटकांचा साठा चिकन सेंटरमध्ये केल्याने हा भीषण स्फोट झाला होता.
ही घटना ताजी असतानाच, शहरात तरुणाईला नशेच्या विळख्यात ओढणार्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी एका युवकाकडून नशेसाठी वापरल्या जाणार्या इंजेक्शन्सचा मोठा साठा जप्त केला. अधिक तपासात या रॅकेटची पाळेमुळे थेट मुंबईपर्यंत पोहोचली. धक्कादायक बाब म्हणजे, ही नशेची इंजेक्शन्स मुंबईतील एका व्यक्तीकडून ऑनलाईन पद्धतीने मागवली जात होती व ती सहज उपलब्ध होत होती. पोलिसांनी मुंबईत जाऊन मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या आवळल्या.
या दोन्ही घटनांमधील समान धागा म्हणजे, वस्तूंच्या देवाणघेवाणीसाठी वापरल्या जाणार्या सेवांमधील मोठी त्रुटी. एका बाजूला एसटी पार्सल सेवेतून स्फोटके येतात, तर दुसर्या बाजूला खासगी ऑनलाईन डिलिव्हरीच्या माध्यमातून नशेचा बाजार फोफावतो. या सेवांवर कोणाचेही डोळसपणे नियंत्रण नसल्याचे हे द्योतक आहे. अशा घटना टाळण्यासाठी पार्सल आणि ऑनलाईन वस्तूंच्या वाहतुकीसंदर्भात कठोर नियमावली आणि तिच्या अंमलबजावणीची नितांत गरज आहे. हे झाले नाही तर नशेचा फास व चालता बोलता स्फोट यातून कोणीही सुटू शकणार नाही.
पोलिसांच्या पहिल्याच टप्प्यात इंजेक्शन पुरवणाराच पोलिसांना सापडल्याने तपासाचे काम हलके झाले होते. तपासात येणारी माहिती मात्र हादरवणारी होती. कारण डॉक्टरचे स्वप्न पाहणार्या तरुणाचाही यामध्ये सहभाग स्पष्ट झाल्याने त्याला अटक झाली होती. तो बाहेरील जिल्ह्यातील असून त्याचे सातार्यात वैद्यकीय शिक्षण सुरु आहे. दरम्यान, नशेसाठी लागणार्या इंजेक्शनची विक्री ही 2 हजारापासून 5 हजार रुपयांपर्यंत करत होता.