वाई : वाई तालुक्यासह परिसरातील शेतकरी यंदा निसर्गाच्या अवकृपेमुळे मेटाकुटीला आला आहे. पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील भात, घेवडा, सोयाबीन, हायब्रीड सूर्यफूल, तीळ यांसह अनेक पिके हातातोंडाशी आलेली असतानाच करपून गेली आहेत. पूर्व भागातील अनेक गावांमध्ये भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, उभ्या पिकांकडे हताशपणे पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. आता दिवाळीचा सण उंबरठ्यावर असतानाही अनेक शेतकऱ्यांच्या घरात सणाचा आनंद नव्हे, तर चिंतेचे सावट आहे. एकीकडे धरणात पाणी दिसते आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर पिके करपताना दिसत आहेत. त्यामुळे ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी विदारक परिस्थिती वाई तालुक्यात निर्माण झाली आहे.
पूर्व भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थितीही गंभीर झाली आहे. ऊस व रब्बी पिकासाठी आवश्यक असलेल्या पाण्याची उपलब्धता आणि कालव्याद्वारे होणारे पाणीवाटप याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. पिके जगविण्यासाठी पाण्याची नितांत गरज असताना उपलब्ध जलसाठ्याचा शेतीसाठी अपेक्षित उपयोग होत नाही.
राज्य शासनाने १४ ऑक्टोबर २०२६ रोजी खरीप हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि दुष्काळाच्या विविध निकषांचा आढावा घेत Trigger-1 आणि Trigger-2 लागू झालेल्या तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित केले आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी शासनाने जमीन महसुलात सवलत, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेती कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या वीजबिलासंदर्भातील सवलती तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात सवलत अशा विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. मात्र पीक नुकसानीची प्रत्यक्ष आर्थिक मदत कधी मिळणार याकडे डोळे लागले आहे.
शासनाच्या निर्देशानुसार महसूल विभागाच्या पथकांकडून नुकसानग्रस्त शेतांची पाहणी आणि पंचनामे सुरू आहेत. वाई तालुक्यातही प्रशासनाने शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली असून, एकही नुकसानग्रस्त खातेदार पंचनाम्यापासून वंचित राहू नये, असे निर्देश उपविभागीय कार्यालयाकडून डॉ. योगेश खरमाटे यांच्याकडून देण्यात आले आहेत. मात्र पंचनामे करण्यापासून पुढे प्रत्यक्ष मदत शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होईपर्यंतची प्रक्रिया सोपी आणि वेगवान करण्याची गरज आहे.
दिवाळीच्या तोंडावर घरात नवीन कपडे, फराळ, पणत्या आणि आनंद असावा, अशी प्रत्येक कुटुंबाची अपेक्षा असते. मात्र अनेक शेतकरी आज कर्जाचा हप्ता कसा भरायचा, घरखर्च कसा भागवायचा आणि पुढील रब्बी हंगामाची तयारी कशी करायची, या विवंचनेत आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दुष्काळी व पीक नुकसान भरपाईची मदत दिवाळीपूर्वी जमा करावी, अशी जोरदार मागणी आता वाई तालुक्यातून होत आहे.