कराड : सहा महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून पाच जणांनी 26 वर्षीय युवकाचा तलवार व कोयत्याने वार करत खून केला. नांदलापूर (ता. कराड) गावच्या शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. प्रवीण बोडरे (रा. जखिनवाडी, तालुका कराड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जखीनवाडी (तालुका कराड) येथील युवकांमध्ये मागील सहा महिन्यांपूर्वी गावच्या यात्रेत राडा झाला होता. त्याचा राग मनात धरून आज (शनिवारी) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नांदलापूर गावच्या हद्दीत संगनमत करून प्रवीण बोडरे याच्यावर तलवार व कोयत्या सारख्या धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. त्याच्या डोक्यावर, हातावर व मांडीवर हे घाव वर्मी करण्यात आले. या हल्ल्यात तो युवक गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी राजश्री पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली.
जखमीला उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटल येथे हलवण्यात आले. मात्र त्याच्यावर गंभीर वार झाल्याने प्रचंड रक्तस्त्राव होऊन त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने जखिनवाडी, नंदलापुर व मलकापूर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक गुन्हे शाखा सातारा व गुन्हे प्रकटीकरण शाखेची दोन पथके संशयीतांच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. पोलिसांना खुनात वापरलेला तलवार व कोयता जप्त केला आहे. पोलिसांनी युवकाचा मृतदेह रात्री उशिरा उत्तरणीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला असून रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद कराड शहर पोलिसात झाली नसल्याने या घटनेची अधिक माहिती समजू शकली नाही.